Tuesday, November 19, 2024
Homeक्राईमजिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाने दिले बनावट शस्त्र परवाने

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाने दिले बनावट शस्त्र परवाने

अवैध शस्त्रांचे प्रकरण || पुण्यातून आणखी एक बनावट रायफल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विविध बँकांमध्ये खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षकाची नोकरी करणार्‍या नऊ जणांकडे बनावट शस्त्र परवाने व रायफली आढळून आल्या होत्या. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, त्यांनी हे सर्व शस्त्र परवाने जम्मू काश्मीरमधील राजौरी येथून काढले असल्याची कबुली पोलिसांना तपासादरम्यान दिली आहे. राजौरी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका लिपिकाने हे परवाने काढून दिले असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

तोफखाना पोलीस व पुणे येथील दक्षिणी कमांड मिलीटरी इंटेलिजन्सच्या संयुक्त पथकाने कारवाई करून बनावट शस्त्र परवाने तयार करून अवैधरित्या बाराबोअर रायफल व काडतुसे जवळ बाळगून अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध बँकांमध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी करणार्‍या नऊ जणांच्या टोळीला पकडले होते. त्यांच्या ताब्यातून बाराबोअर नऊ रायफल, 58 काडतुस असा तीन लाख 77 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आनंद कोकरे करत आहेत. पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केली असता शस्त्र परवान्याबाबत माहिती समोर आली आहे.

राजौरी जिल्हाधिकारी कार्यालयातील एक लिपिक बनावट शस्त्र परवाने तयार करत होता. तो एखाद्या व्यक्तीला बनावट शस्त्र परवाना तयार करून देण्यासह बाराबोअर रायफल मिळून देत होता. त्या बदल्यात तो त्यांच्याकडून 40 ते 45 हजार रुपये घेत होता. ज्यांना महाराष्ट्रात येऊन खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षकाची नोकरी करायची आहे असे अनेक तरुण त्या लिपीकाला संपर्क करून त्याच्याकडून परवाना व रायफल घेत होते. दरम्यान सदरचा शस्त्र परवाना बनावट व रायफलही गावठी बनावटीची असताना त्या महाराष्ट्रात येईपर्यंत कोणाच्याही हा प्रकार लक्ष्यात आला नाही. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून हा उद्योग सुरू होता.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आणखी काही जण सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी रविवारी पुणे येथील एका खासगी एजन्सीकडे बनावट शस्त्र परवाना वापरून काम करणार्‍या एका सुरक्षा रक्षकाची गावठी बनावटीची रायफल जप्त केली आहे. यापूर्वी पोलिसांनी नऊ रायफली जप्त केल्या होत्या. तो सुरक्षा रक्षक मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

एजन्सी, बँकांचा सावळा गोंधळ
बँकांमध्ये बंदुकधारी सुरक्षा रक्षक नियुक्त असतो. या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती एका खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत केली जाते. बहुतेकवेळा अशा एजन्सीकडे सेवानिवृत्त सैनिक नोकरी करत असतात. त्यांना पगार जास्त द्यावा लागतो. त्या तुलनेत बनावटगिरी करून नोकरी शोधत असलेल्या परप्रांतीय व्यक्ती कमी पगारात सुरक्षा रक्षकाची नोकरी करण्यास तयार होतात. त्यामुळे खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाते. त्यांच्याकडून नियुक्तीवेळी शस्त्र परवाना, रायफल याची कोणतीही पडताळणी केली जात नाही. बँक प्रशासनाकडूनही पडताळणी न करता अशा सुरक्षा रक्षकांच्या हाती बँकेची सुरक्षा दिली जाते. सुरक्षा एजन्सीपासून बँकांपर्यंत सावळा गोंधळ सुरू असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या