अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बनावट शस्त्र परवाने तयार करून अवैधरित्या बाराबोअर रायफल व काडतुसे जवळ बाळगून अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध बँकांमध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी करणार्या नऊ जणांच्या टोळीला पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून बाराबोअर नऊ रायफल, 58 काडतुसे असा तीन लाख 77 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस व पुणे येथील दक्षिणी कमांड मिलीटरी इंटेलिजन्सच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून या नऊ जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जम्मू काश्मीरमधील रहिवाशी असलेले काहीजण बनावट शस्त्र परवाने तयार करून त्याआधारे गावठी बनावटीच्या बाराबोअर रायफल खरेदी करून नगरसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी खासगी सुरक्षा एजन्सीमार्फत बँकांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. ते शासनाची फसवणूक तर करत आहेतच शिवाय त्यांच्या पासून सार्वजनिक सुरक्षेलाही धोका आहे, अशी माहिती तोफखाना पोालिसांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना माहिती दिली व पुढील कारवाईसाठी दक्षिणी कमांड मिलीटरी इंटेलिजन्स, पुणे यांची मदत घेतली. दोघांच्या संयुक्त पथकाने संशयितांची नावे व ते कुठे काम करतात याची माहिती काढली. त्यानंतर एकाच वेळी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सोनई (ता. नेवासा), श्रीगोंदा तसेच छत्रपती संभाजीनगर, पुणे येथेे ठिकठिकाणी छापेमारी करत नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये शब्बीर मोहंमद इक्बाल हुसैन गुज्जर, महंमद सलीम उर्फ सार्लेम गुल महंमद, महंमद सफराज नजीर हुसैन, जहांगिर झाकिर हुसैन, शाहबाज अहमद नजीर हुसैन, सुरजित रमेशचंद्र सिंग, अब्दुल रशिद चिडीया, तुफेल अहमद महंमद गाजीया, शेर अहमद गुलाम हुसैन यांचा समावेश आहे. हे सर्व मुळचे जम्मू काश्मीर मधील राजौरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत व सध्या महाराष्ट्रात राहून नोकरी करत आहेत.
शब्बीर गुज्जर याने 2015 मध्ये शेर अहमद गुलाम हुसैन याच्याकडून तारकपूर बसस्थानक परिसरात गावठी बनावटीचे बाराबोअर रायफल, बनावट शस्त्र परवाना व जिवंत काडतुस विकत घेतले होते. तर इतरांनी जम्मु काश्मीरच्या राजौरी येथुन बाराबोअर रायफल, बनावट शस्त्र परवाना व जिवंत काडतुसे खरेदी केल्याचे तपासात समोर आले. या सर्वांकडे राजौरी जिल्हाधिकार्यांच्या सह्यांचे शस्त्र परवाने आढळून आले होते. त्याची खातरजमा केल्यावर ते बनावट असल्याचे समोर आले. या सर्वांकडून नऊ गावठी बनावटीचे बाराबोअर रायफल, 58 जिवंत काडतुस, बनावट शस्त्र परवाने असा तीन लाख 77 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधीक्षक ओला, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण कमांड मिलीट्री इंटेलिजन्स, पुणे यांचे अधिकारी, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, गणेश धोत्रे, सुधीर खाडे, सुरज वाबळे, वसीम पठाण, सुमीत गवळी, शिरीष तरटे, सतीष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतीष भवर, राहुल म्हस्के, संदीप गिर्हे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सुरक्षा एजन्सी रडारवर
पकडलेल्या नऊ जणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे बनावट शस्त्र परवाने आढळून आले. मात्र याच शस्त्र परवान्यांच्या आधारे सुरक्षा एजन्सींनी या नऊ जणांना नोकरीवर घेतले. त्यांच्याकडे विविध बँकांच्या सुरक्षेची जबाबदारी दिली. शस्त्र परवाने बनावट असून देखील या सुरक्षा एजन्सींनी नोकरी दिल्याने त्यांची चौकशी पोलिसांकडून केली जाणार आहे.
पकडलेल्या व्यक्तींनी बनावट शस्त्र परवाने कसे तयार केले. त्यासाठी त्यांनी कोणाची मदत घेतली. शस्त्रे कुठून प्राप्त केली. त्यांना नोकरीवर घेतलेल्या सुरक्षा एजन्सी यांची चौकशी करण्यात येणार आहे.
– राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर.