अहिल्यानगर (प्रतिनिधी)
येथील एमआयडीसी परिसरात बासमती तांदळाच्या नावाखाली बनावट तांदूळ तयार करून विक्री केला जात असल्याच्या प्रकाराचा अन्न व औषध प्रशासनाने भंडाफोड केला. सुमारे 62 लाख रूपये किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. सदर बनावट तांदळाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एमआयडीसी परिसरात बासमती तांदळाच्या नावाखाली बनावट तांदूळ तयार करून विक्री केला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनंतर एमआयडीसीतील एका आस्थापनाच्या गोदामावर छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान साध्या तांदळावर रासायनिक पावडर फवारून कृत्रिम सुगंध व बासमतीचा भास निर्माण करण्यात येत असल्याचे आढळून आले.
नंतर या बनावट तांदळाचे ‘खुशी गोल्ड’ ब्रँडच्या बॅगांमध्ये आकर्षक पॅकिंग करून विक्रीसाठी तयार ठेवण्यात येत होते. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी साठवलेला तांदूळ व वापरण्यात येणारी रासायनिक पावडर ताब्यात घेतली आहे. एकूण जप्त केलेल्या बनावट बासमती तांदळाची किंमत तब्बल 62 लाख रूपये असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तांदळाचे नमुने अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
ही कारवाई शुक्रवारी रात्री सहाय्यक आयुक्त सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, नमुना सहाय्यक सागर शेवंते व शुभम भस्मे यांनी केली. या प्रकरणाचा तपास अन्न सुरक्षा अधिकारी बडे करीत आहेत.
नागरिकांच्या जीवाशी खेळ
या आस्थापनाचे अहिल्यानगर शहरातील दाळमंडई परिसरातही दुकान असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दुकानातून बनावट बासमती तांदळाची विक्री केली जात असल्याचा संशय असून, यासंबंधीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ करणार्या भेसळीच्या धंद्यावर आळा बसला आहे.