अहिल्यानगर (प्रतिनिधी)
शहरातील केडगाव परिसरातील नेप्ती रस्त्यावरील श्री माया ज्वेलर्स या दुकानात ग्राहकाच्या बहाण्याने आलेल्या एका चोरट्याने सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे 23 ग्रॅमचे सोन्याचे मिनीगंठण लंपास केले.
गुरूवारी (1 जानेवारी) सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. गोपेश संजय नागोरी (वय 24, रा. एकनाथनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीचे केडगाव येथे सोन्या-चांदीचे दुकान आहे. गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास एक 25 वर्षीय अनोळखी तरूण त्यांच्या दुकानात आला. त्याने पत्नीसाठी दागिना घ्यायचा असल्याचे सांगून फिर्यादींकडे सोन्याचे गंठण दाखवण्याची विनंती केली. विश्वासाने फिर्यादीने त्याला विविध वजनाचे दागिने दाखवले. त्यापैकी एका मिनीगंठणाची त्याने निवड केली आणि बिल बनवण्यास सांगितले.
फिर्यादी जेव्हा बिल बनवण्यात व्यस्त झाले, तेव्हा संधी साधून त्या चोरट्याने हातातले 23 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण घेऊन दुकानाबाहेर धूम ठोकली. फिर्यादी यांनी तात्काळ पाठलाग केला, मात्र तो गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला.
फिर्यादीने त्याचा केडगाव परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. चोरीला गेलेल्या दागिन्याची किंमत सुमारे 2 लाख 50 हजार रूपये आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.




