Friday, November 15, 2024
Homeनगरबनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण; जिल्हा रूग्णालयातील सहा कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविले

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण; जिल्हा रूग्णालयातील सहा कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविले

संशयित आरोपींचा शोध सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांकडून तपास सुरू आहे. दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी काम करणार्‍या जिल्हा रुग्णालयातील संबंधित सहा कर्मचार्‍यांचे जबाब तोफखाना पोलिसांनी काल, मंगळवारी नोंदविले. दरम्यान, जे चार दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आढळून आले आहेत ते पोलिसांनी पंचासमक्ष जिल्हा रुग्णालयातून जप्त केले आहेत.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याप्रकरणी सागर केकाण, प्रसाद बडे, सुदर्शन बडे आणि गणेश पाखरे अशा चार जणांसह रुग्णालयातील अन्य दोघा संशयितांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील करत आहेत. त्यांनी जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाला पत्र पाठविले होते. त्यात दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याची प्रक्रिया कशी आहे, हे प्रमाणपत्र कोणाला दिले जाते, त्यासाठी संबंधितांची तपासणी करण्याचे अधिकार कोणाला आहेत. पोर्टल सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत किती जणांना दिव्यांग प्रमाणपत्र वितरित केले त्याची यादी मागितली होती. मात्र आत्तापर्यंत फक्त दिव्यांग प्रमाणपत्र काढताना रजिस्टरमध्ये करण्यात आलेल्या नोंदीच्या झेरॉक्स प्रती रुग्णालयाकडून पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मात्र पोर्टल सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत किती जणांना दिव्यांग प्रमाणपत्र वितरित केले त्याची यादी पोलिसांना मिळालेली नाही.

दरम्यान, पोलिसांनी बनावट काढण्यात आलेले चार दिव्यांग प्रमाणपत्र पंचासमक्ष रुग्णालयातून जप्त केले आहे. काल, मंगळवारी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी पोर्टलचे काम पाहणार्‍या रुग्णालयातील संबंधित सहा कर्मचार्‍यांना जबाबासाठी पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. उपनिरीक्षक पाटील यांनी या सहा कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविले आहेत. आणखी काही कर्मचारी व अधिकार्‍यांचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

संशयितांचे अटकपूर्वसाठी प्रयत्न
या गुन्ह्यात चार जणांसह त्यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत करणार्‍या जिल्हा रुग्णालयातील दोन संशयितांचा आरोपीमध्ये समावेश आहे. ते सर्वजण गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाले आहेत. त्यांना अटक केल्यानंतरच हे प्रमाणपत्र कसे काढले याची माहिती समोर येणार आहे. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. दरम्यान, काही संशयितांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या