अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा रूग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून त्याच्या आधारे शासकीय नोकरी मिळवलेल्या तिघांसह चौघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी (1 जानेवारी) सायंकाळी अटक केली. यामध्ये दोघांनी शिक्षक म्हणून, तर एकाने तहसील कार्यालयात क्लार्क पदावर नोकरी मिळवली आहे. चौथ्या संशयिताने शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा संशय असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.
गदेवाडी (ता. शेवगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेला भारत भागीनाथ फुंदे (वय 34, रा. भुते टाकळी, ता. पाथर्डी), मंगळूरपीर (जि. वाशिम) येथील तहसील कार्यालयात क्लार्क पदावर कार्यरत असलेला नागनाथ जगन्नाथ गर्जे (वय 34, रा. भगवाननगर, पाथर्डी), पुणे महापालिकेच्या मुंढवा शाळेत शिक्षक असलेला देवीदास प्रकाश बोरूडे (वय 35, रा. तनपुरवाडी, ता. पाथर्डी) तसेच खंडेराव ज्ञानोबा फुंदे (वय 32, रा. भुते टाकळी, ता. पाथर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. जिल्हा रूग्णालयातील काही कर्मचार्यांंना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता तसेच रूग्णालयात नोंद न करता थेट ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यात आल्याचा प्रकार जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून उघडकीस आला होता.
याप्रकरणी जिल्हा रूग्णालय प्रशासनातील वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पुढे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश उगले या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यातील जिल्हा रूग्णालयातील एका संशयित आरोपी कर्मचार्याचा मृत्यू झाला आहे. तसेच या प्रकरणातील तिघांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी सायंकाळी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना आज (शुक्रवार) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवलेल्या तिघांना अटक झाल्याने नोकरदार वर्गात खळबळ उडाली आहे. तसेच अशाच पध्दतीने आणखी काही जणांनी शासकीय नोकर्या मिळवल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.




