Wednesday, June 17, 2026
HomeनगरSonai : 22 लाख रूपयांचा बनावट खतांचा साठा जप्त

Sonai : 22 लाख रूपयांचा बनावट खतांचा साठा जप्त

नेवाशाच्या पांढरीपूल एमआयडीसीतील खत कारखान्यावर छापा

सोनई |वार्ताहर| Sonai

शिंगवे तुकाई एमआयडीसी येथे कृषी विभागाच्या वतीने छापा टाकून 21 लाख 80 हजार रुपयांच्या रासायनिक खताच्या पॅकिंग केलेल्या 2 हजार 34गोण्या विक्री व साठवणुकीसाठी आढळून आल्याने खतांचे नमुने तपासण्या करून दुय्यम दर्जाच्या खतांचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावरील शिंगवेतुकाई एमआयडीसी येथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॅगात दुय्यम दर्जाचे खत विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची बातमी अहिल्यानगरच्या कृषी विभागाला मिळाल्याने त्यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा सदर ठिकाणी छापा टाकला असता या छाप्यात सॉईल संजीयन ऑग्रोनिक फर्टीलायझर मांजरवाडी (ता. खेड जिल्हा पुण)े उत्पादित 57 हजार 750 रुपयांच्या 50 गोण्या, कृषी गौरव फर्टीलायझर प्रा. लि. कंपनी उत्पादित 4 लाख 14 हजार रुपयांच्या 360 गोण्या, मित्राश्री ग्रोटेक इंडस्ट्री उत्पादित ग्रेड पीडीएफच्या 4 लाख 93 हजार 920 रुपयांच्या 336 गोण्या, क्लासवन अग्रोबायोटिक फर्टीलायझरच्या 4 लाख 47 हजार 720 रुपयांच्या 364 गोण्या, मित्राश्री ग्रोटेक इंडस्ट्री उत्पादित ग्रेड प्रोमच्या 2 लाख 49 हजार 900 रुपयांच्या 170 गोण्या, मित्राश्री ग्रोटेक इंडस्ट्री उत्पादित ग्रेड सिलीकॉनच्या किंमत नसलेल्या 32 गोण्या, मित्राश्री ग्रोटेक इंडस्ट्री उत्पादित ग्रेड फॉस्पोजिप्समच्या किंमत नसलेल्या 270 गोण्या, बीएसएच ग्रोनॉमी कंपनीच्या 5 लाख सहा हजार रुपये किमतीच्या 440 गोण्या, ग्रीन माईन बायोटेक कंपनीच्या 11 हजार 196 रुपये किमतीच्या 12 गोण्या.

असा एकूण 21 लाख 80 हजार 486 रुपये किमतीच्या 2 हजार 34 गोण्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नेवाशाचे कृषी अधिकारी वाल्मीक एकनाथ सुडके यांच्या फिर्यादीवरून किरण चंद्रकांत दौंडकर रा. केडगाव (अहिल्यानगर) याच्यावर बीएनएस कलम 318(4) रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 चे कलम 19(सी)(1), 19(सी)(4), (5) अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3(2)(अ),3(2)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेचा पुढील तपास पीएसआय सुरज मेढे हे करत आहे.

सदर कामगिरी जिल्हा परिषद प्रभारी कृषी विकास अधिकारी विकास काळे, मोहीम अधिकारी निलेश अभंग, कृषी अधिकारी (पं.स. नेवासा) वाल्मीक सुडके, तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेवासाचे कृषी अधिकारी सुहास धस, आणि पंचायत समिती पारनेरचे कृषी अधिकारी राहुल कदम यांच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी पार पाडली.

कृषी विभागाचे संचालक (गुण नियंत्रण) सुनील बोरकर, कृषी सहसंचालक बाळासाहेब जेजुरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक देशमुख साहेब, आणि अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व सुधीर शिंदे कृषि विकास अधिकारी अहिल्यानगर यांचे मार्गदर्शन लाभले.

अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करा
जिल्ह्यात कोठेही अशा प्रकारच्या बोगस खतांची निर्मिती, साठवणूक किंवा जादा दराने विक्री होत असल्याचे आढळल्यास कृषी विभागाकडून अशीच धडक मोहीम राबवून गुन्हे दाखल केले जातील. शेतकर्‍यांनीही खते खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी आणि संशयास्पद वाटल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा.
-सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर

बनावट खत विक्री करणार्‍यांना इशारा
शेतकर्‍यांची फसवणूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. संबंधित कंपनीला केवळ स्वतःच्या उत्पादनाचा परवाना असताना, त्यांनी इतर कंपन्यांच्या नावाने खतांची बेकायदेशीर पॅकिंग करून शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. ही कारवाई म्हणजे अनधिकृत आणि बनावट खत विक्री करणार्‍यांना एक इशारा आहे.
-निलेश अभंग मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17...