Sunday, September 15, 2024
Homeधुळेजुने धुळ्यात बनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त

जुने धुळ्यात बनावट दारुचा कारखाना उद्ध्वस्त

धुळे  – 

- Advertisement -

शहरातील जुने धुळे भागातील ग.नं.14 च्या परिसरात असलेल्या देविदास नगरात बनावट दारूचा कारखाना  आझादनगर पोलिसांनी  उद्ध्वस्त केला. तब्बल दोन तास चाललेल्या  या कारवाईत पोलिसांनी दारू बनविण्यासह पॅकिंगचे साहित्य जप्त केले असून याप्रकरणी एकाला ताब्यातही घेण्यात आले आहे.अशी माहिती आझादनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.

याबाबत माहिती  जुने धुळे भागातील ग.नं.14 च्या परिसरात एका मोकळ्या जागेत बनावट दारू बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली  हेकॉ.दीपक पाटील, संजय सुर्यवंशी, महिला हेकॉ.वाडिले, पोना.पाथरवट, रमेश माळी, पोकॉ. संजय भोई, शोएब बेग, अतिक शेख, डी.बी.मालचे, जे.बी.भागवत, सागर सोनवणे, संतोष घुगे यांच्या पथकाने रात्री सव्वा दहाच्या सुमारास देविदास नगरात छापा टाकला.

यावेळी देविदास नगरातील सुर्यमंदिराजवळ एका घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळा जागेत दारू बनविण्याचा कारखाना सुरू  असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणी असलेल्या देशी-विदेशी दारूच्या साठ्यासह बाटलीचे बुच, रिकाम्या बाटल्या, बुच सिलबंद करण्याचे मशिन, प्लास्टिकचे ड्रम आदी मिळून 32 हजार 549 रूपयांचा ऐवज जप्त केला.

याप्रकरणी सागर गणेश परदेशी या 25 वर्षीय तरूणालाही ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (फ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या