श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
पैशांसाठी खोटे लग्न करून फसवणूक करणार्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला श्रीगोंदा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेत अटक केली आहे. चौघांचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्याकडून पाच लाखांची कार जप्त करण्यात आली आहे.
नवरीच्या दाजीचा रोल करणारा विठ्ठल किसन पवार (वय 37 रा. महालक्ष्मी खेडा, सावखेडा, जि. छत्रपती संभाजीनगर), नवरीच्या काकाचा रोल करणारा ज्ञानेश्वर लक्ष्मण दाभाडे (वय 45 रा. धुपखेडा, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह नवरीचा बनावट रोल करणारी महिला व नवरीच्या बहिणीचा बनावट रोल करणारी महिला अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. पैशांसाठी खोटे लग्न करून फसवणूक केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास श्रीगोंदा पोलिसांकडून सुरू होता.
पोलिसांच्या पथकाने खबर्या मार्फत व तांत्रिक तपास करून संशयितांच्या वास्तव्याची माहिती काढली व त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेत सोमवारी (16 सप्टेंबर) अटक केली. त्यांना मंगळवारी (17 सप्टेंबर) न्यायालयासमोर हजर केले असता चौघांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (कर्जत विभाग) विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, पोलीस अंमलदार गोकुळ इंगावले, संदीप शिरसाठ, आनंद मैड, संदीप राऊत, प्रमिला उबाळे, दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंड्डू, नितीन शिंदे यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार गोकुळ इंगावले करीत आहेत.