अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे उघडकीस आलेल्या बनावट दूध निर्मिती प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटकेत असलेल्या सात संशयित आरोपींविरूध्द जामखेड न्यायालयात सुमारे 850 पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरणार्या रसायनांपासून कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री केल्याचा गंभीर आरोप या आरोपींवर ठेवण्यात आला आहे.
तपासादरम्यान उघडकीस आलेल्या माहितीनुसार, पॅराफिन ऑईल, ‘9.5’ नावाचे केमिकल आणि दूध फ्लेवर पावडर यांचे मिश्रण करून कृत्रिम क्रिम तयार केली जात होती. या क्रिमपासून मोठ्या प्रमाणात बनावट दूध तयार करून ते विविध दूध संकलन केंद्रांना विक्रीसाठी पुरवले जात होते. विशेष म्हणजे, एक लिटर क्रिमपासून सुमारे 20 लिटर बनावट दूध तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सुरू आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण 41 संशयित आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी सात जण सध्या अटकेत आहेत. त्यांच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून उर्वरित 34 संशयित आरोपी अद्याप पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. या सर्वांविरूध्द लवकरच पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान, 14 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे छापा टाकला होता. या कारवाईत बनावट दूध निर्मितीचा संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. तपासादरम्यान देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे यंत्राव्दारे रसायनांचे मिश्रण करून मोठ्या प्रमाणात घातक क्रिम तयार केली जात असल्याचे आढळले होते. संशयित आरोपींनी पॅराफिन ऑईल, 9.5 केमिकल, दूध प्लेवर पावडर यांचे मिश्रण करून तयार घातक द्रावण तयार करायचे. त्यापासून मानवी शरीरास घातक व हानिकारक कृत्रिम दूध तयार केले जात होते. बनावट दूध तयार करण्याचे रसायन एकमेकांना खरेदी-विक्री करून त्याच्या पासून कृत्रिम दूध तयार करून दूध संकलन केंद्रास विक्री केली. तसेच गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप या आरोपींवर ठेवण्यात आला आहे.
समीर कमरूद्दीन शेख (वय 30, रा. उंबरे, ता. राहुरी), आफताब कलीम शेख (वय 28, रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी), रामदास नवनाथ उबाळे (वय 46, रा. फक्राबाद, ता. जामखेड), अर्जुन हरिश्चंद्र जगदाळे (वय 42, रा. पतंजली पार्क, कोर्टामागे, नेवासा), किरणकुमार भास्कर रोहकले (वय 38, रा. वांगी खुर्द, ता. श्रीरामपूर), संतोष माधव धसाळ (वय 34, रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) व अक्षय मधुकर निकम (वय 24, रा. आरडगाव, ता. राहुरी) अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.




