Monday, September 28, 2026
Homeक्राईमAhilyanagar : बनावट दूध प्रकरणात गोठ्यावर पंचनामा

Ahilyanagar : बनावट दूध प्रकरणात गोठ्यावर पंचनामा

मोबाईल, वाहन जप्त || संशयितांकडे कसून चौकशी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

घातक क्रीमपासून बनावट दूध तयार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तांदुळवाडी (ता. राहुरी) येथील संतोष माधव धसाळ याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या कोठडीत आहे. त्याच्याकडे चौकशी केली जात असून त्याचा मोबाईल व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. तपासासाठी पोलिसांनी त्याला तांदुळवाडी येथील घरी नेले होते. दरम्यान, त्याच्या कामगाराकडे देखील पोलिसांनी कसून चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

बनावट दूध तयार करून त्याची विक्री केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट दूधासाठी वापरले जाणारे घातक क्रीम राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे तयार केले जात होते व त्याची मोठ्या प्रमाणावर राहुरी तालुक्यात विक्री होत असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. संतोष धसाळ हा देखील बनावट दूध तयार करत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर तांदुळवाडी परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, धसाळ याचा तांदुळवाडी परिसरात गोठा आहे. त्या गोठ्यातून बनावट दूधाची निर्मिती केली जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी मंगळवारी त्या ठिकाणी भेट दिली. तेथे पंचनामा केला. तसेच धसाळ याने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व चारचाकी वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. बनावट दूध तयार करण्यासाठी मदत करणार्‍या त्याच्या कामगाराकडे देखील पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यातून देखील काही महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राहुरीत मोठे रॅकेट
बनावट दूध तयार करून विक्री करणार्‍या या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे. घातक क्रीम तयार करणार्‍यांसह त्याची विक्री करणारे आणि बनावट दूध तयार करणारे अशी मोठी साखळी राहुरी तालुक्यातील आहे. त्यांना या प्रकरणात संशयित आरोपी करण्यात आला आहे. आरोपी झाल्यानंतर संशयित पसार झाले आहेत. काहींनी अटकपूर्व मिळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात बनावट दूधाचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गांजा कारवाईतील तक्रारीनंतर चार अंमलदारांच्या बदल्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कोतवाली पोलिसांनी केलेल्या कथित गांजा कारवाईतील कागदपत्रे, स्टेशन डायरीतील नोंदी आणि सीसीटीव्ही फुटेजमधील घटनाक्रमात विसंगती असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक...