पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
आरटीओ कार्यालयाचा लोगो लावलेल्या स्कॉर्पिओ गाडीत खाकी गणवेश घालून वाहन चालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार्या दोन तोतया आरटीओ अधिकार्यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार वाहन निरीक्षक सुनिल पाटील यांनी फिर्याद दिली असून या घटनेतील दोघाही तोतया अधिकार्यांना बीड जिल्ह्यातील एलसीबीच्या पथकाने अटक केली.
नगर येथील केवल जग्गी यांच्या मालकीचा ट्रक घेऊन चालक अशोक पांचाळ हा बीडकडे जात असताना पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे आरटीओचा लोगो लावलेली स्कॉर्पिओ गाडी आली व त्यांनी ट्रक चालकाला गाडीचे फिटनेस प्रमाणपत्र संपले असून यामुळे 64 हजार दंड भरावा, असे सांगत 25 हजारांची तडजोड केली. दरम्यान या प्रकाराचा जग्गी यांना संशय आला व त्यांनी मोटार मालक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप यांच्याशी संपर्क केला. सानप त्यांनी संबंधित तोतयांशी चर्चा केल्यानंतर त्यातील एकाने मी वडाळा आरटीओमधून सूर्यवंशी बोलतोय असे सांगितले. सानप यांनाही संशय आल्याने त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांना या प्रकरणाची माहिती दिली. सगरे यांनी पाटील यांना चौकशी करण्यास सांगितले.
पाटील यांनी स्कॉर्पिओ गाडी कोणत्या ठिकाणची आहे, याची चौकशी केली असता, ती ठाणे आरटीओ कार्यालयाची असल्याचे समोर आले. मात्र त्यांची गाडी त्यांच्या कार्यालयात असल्याचीही माहिती मिळाली व तेथे सूर्यवंशी नावाचे कोणीही अधिकारी नाहीत असे समजले. त्या नंतर पाटील यांनी आरोपी विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. दरम्यान हे दोघेही तोतया अधिकारी बीड जिल्ह्यात गेले असल्याचे समजताच अहिल्यानगर आरटीओ कार्यालयाने बीड आरटीओ कार्यालयाशी संपर्क केला व बीड आरटीओ कार्यालयातील अधिकारी गणेश विघ्ने यांनी या दोघांना गाडीसह ताब्यात घेत बीड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहेर. दरम्यान, आरोपीची नावे अजय गाडगे व दिनेश धनवर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.