Saturday, May 4, 2024
Homeनगरकुटूंबनियोजनाचे पुरूषांना वावडे!

कुटूंबनियोजनाचे पुरूषांना वावडे!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण भागात लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कुटूंब कल्याण कार्यक्रम राबवण्यात येतो. यात महिलांसोबतच पुरूषांच्या शस्त्रक्रिया करण्यात येते. यासह गर्भधारणा टाळण्यासाठी अन्य उपाययोजनांचा समावेश आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून शस्त्रक्रियेला प्राधान्य देण्यात येते. यात पुरूषांपेक्षा महिला आघाडीवर असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

- Advertisement -

पाळणा लांबवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणे, दोन अपत्यानंतर शस्त्रक्रिया करणे यासह पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागातर्फे प्रचार-प्रसार केला जात आहे. परंतु कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकडे पुरुष पाठ दाखवीत आहेत. प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे करूनही पुरुषांचा टक्का गेल्या कित्येक वर्षांपासून वाढलेला नाही.

सर्वच कामांत महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. मात्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात पुरुषांची उदासीनता दिसते. आरोग्य विभागाकडील आकडेवारीनूसार एप्रिल ते डिसेंबर 2022 या 9 महिन्यांत जिल्ह्यात 14 हजार 822 कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाल्या. यात राहाता, पारनेर, जामखेड, नगर, राहुरी, संगमनेर, कोपरगाव या तालुक्यांचे प्रमाण 60 टक्क्यांच्या पुढे आहे, तर नेवासा, शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर हे तालुके 50 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. तर याच 9 महिन्यांत कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांमध्ये अवघ्या 33 पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया केलेली आहे. हे प्रमाण महिला शस्त्रक्रियेच्या तुलनेत अर्ध्या टक्क्याहून कमी आहे.

महिलांचे प्रमाण 99.50 टक्के

नगर जिल्ह्यात 2022-23 या वर्षी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे 24 हजार 719 एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात गेल्या नऊ महिन्यांत डिसेंबरअखेर 14 हजार 822 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. त्यातील केवळ 33 शस्त्रक्रिया पुरुषांच्या आहेत. बाकी सर्व महिल्यांच्या आहेत. दोन अपत्यांनंतर ही शस्त्रक्रिया करून घेण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेक कुटुंबांत एका अपत्यानंतर ही शस्त्रक्रिया करून घेतली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या