अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रमात ९ तालुक्याची कामगीरी ५० टक्क्यांच्या आत आहे. यामुळे सबंधीत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ९ तालुक्यातील ६९ प्राथमिक आरोग्य केंद्राची कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेची कामगिरी सुमार असल्याने आरोग्य विभागाचे वतीने नाराजी व्यक्त करत तातडीने कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया वाढवण्याचे आदेश दिले आहे. अकोले तालुक्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम शून्य टक्के असून कोपरगाव तालुक्यातील संवत्सरचे आठ टक्के तर श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अवघे दहा टक्के आहे.
कुटुंब नियोजन कार्यक्रमात शस्त्रक्रियेसह अन्य उपाययोजना करण्यात येत असून यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेला दरवर्षी शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. या उद्दिष्टानुसार शस्त्रक्रिया पूर्ण व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने आढावा घेण्यात येत आहे. जिल्ह्यात जानेवारीअखेर १४ पैकी ९ तालुक्यात कुटूंबनियोजन शस्त्रक्रियेत उद्दिष्टाच्या अवघे २२ ते ४३ टक्के काम दिसत आहे, यात सर्वाधिक काम राहाता तालुक्यात १०६ टक्के असून राहुरी ६३, जामखेडमध्ये ६१, पारनेरमध्ये ५६ आणि नगर तालुक्यात ५३ टक्के काम झालेले आहे. उर्वरित तालुक्यात अकोले ४३, श्रीरामपूर ४१, संगमनेर ४०, नेवासा ४०, कर्जत ३७, कोपरगाव ३३, पाथर्डी ३२, शेवगाव २३ आणि श्रीगोंदा २२ टक्के असून जिल्ह्यात अवघे ४७ टक्के काम झालेले आहे.
या शस्त्रक्रिया कार्यक्रमात एक किंवा दोन अपत्य, अथवा दोन अपत्यापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांची शस्त्रक्रिया करण्यात येते. जिल्ह्यात एक किंवा दोन अपत्य वरील १५ हजार ७७१ महिलांची शस्त्रक्रिया उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ७ हजार ६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर दोनपेक्षा जास्त आपत्य असणाऱ्या ६ हजार ७५९ महिलांच्या शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. यापैकी २ हजार ६८९ महिलांच्या शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे २२ हजार ५३० उद्दिष्टापैकी १० हजार ६३६ पूर्ण झालेले आहे. एकूण उद्दिष्टाचे हे प्रमाण ४७ टक्के आहे. यामुळे कमी काम असणाऱ्या संबंधित तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना नोटीस बजावण्यात आले आहेत.
लाडगाव, मुवेशी, सवंत्सर, मांडवगण, देवठाण, घोटण नेवासा खुर्द, चापडगाव, तिसगाव, पिंपळगाव पिसा, चापडगाव खू चंदनपुरी, हातगाव, आढळगाव, महालदेवी, टोका, कोळगाव, मिरजगाव, भातकुडगाव, बेळगाव, धांदरफळ बु., काष्टी, खरवंडी कासार, रुईछत्तीशी, टाकळी ब्राह्मणगाव, कानूरपठार, लोणी व्यंकनाथ, मिरी, देवगाव, माणिकदौंडी, आश्वी, पोहेगाव, बारडगाव सुद्रिक, जवळे बालेश्वर, जेऊर, वारी, जवळे कडलक, तळेगाव, चासनळी, पागोरी पिंपळगाव, निमोण, राशीन, टाकळी काझी, पिंपळगाव टप्पा, ढोरजळगाव शे, उंबरे, सोनई, कोल्हार बु. कुकाणा, दाढ बु., वाकडी, वाळकी, विटा, बारागाव नांदूर, सलाबतपुर, नान्नज, चांदा, निघोज, खर्डा, बोटा, शिरसगाव, निमगावजाळी, खिरवीरे, देवळाली प्रवरा, टाकळीभान, गुहा, डोहाळे आणि अस्तगाव आरोग्य केंद्राची कामगिरी खराब आहे.