नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशात मोठी दहशतवादी कारवाईचा पर्दाफाश झाला आहे. रविवारी गुजरातमधून आयसीसीशी संबंधीत तीन दहशतवाद्यांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आज सोमवारी हरयाणातील फरिदाबादमधील एका डॉक्टरच्या घरावर जम्मू काश्मीर पोलिसांनी छापा मारला. यात दहशतवादविरोधी कारवाई करताना पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. देशात मोठा दहशतावादी हल्ला करण्याचा कट यातून उधळण्यात आला आहे. पोलीसांनी टाकलेल्या या छाप्यात अंदाजे ३०० किलो आरडीएक्स (स्फोटके) जप्त केले आहेत. त्याशिवाय, एके-४७ रायफल आणि जिवंत काडतूसे मिळाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून आदिल अहमद याला अटक केली होती. आदिलची चौकशी सुरू असताना त्याने फरीदाबादमध्ये स्फोटके साठवल्याचे कबूल केले. त्याच्या चौकशी दरम्यान रविवारी, जम्मू पोलिसांनी ३०० किलो आरडीएक्स, एक एके-४७ रायफल, ८४ काडतुसे आणि पाच लिटर रसायने जप्त केली. जप्त केलेल्या एकूण वस्तूंची संख्या ४८ असल्याचा अंदाज आहे. त्यावरुन देशात मोठा दहशतवादी कट उधळला गेला असून पोलिस चौकशी सुरू आहे.
आदिल पूर्वी अनंतनागमधील जनरल हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होता. त्याने २०२४ मध्ये तिथून राजीनामा दिला आणि त्यानंतर सहारनपूरमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. आदिलने फरीदाबादमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती. दरम्यान, डीसीपी एनआयटी मकसूद अहमद, धौज पोलिस स्टेशनचे एसएचओ आणि पोलिस प्रवक्ते यांनी या कारवाईचे अथवा अटकेचे वृत्त नाकारले आहे. पोलिस आयुक्त सतेंद्र गुप्ता यांनीही मीडियाशी बोलण्यास नकार दिला.
पोलिसांनी खोलीतून १४ बॅगा जप्त केल्या, ज्यामध्ये ३०० किलो आरडीएक्स, एक एके-४७ रायफल, ५ लिटर रसायने, ८४ काडतुसे आणि दोन स्वयंचलित पिस्तूल होते. तर १० ते १२ वाहने घटनास्थळी आली. जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि गुजरात या चार राज्यांशी संबंध असल्याचे तपासले जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




