अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात कापूस पिकावरील सेंद्रिय बोंडआळीचा बंदोबस्त करण्यासाठी 1 जूननंतर कपाशी लागवड सुरू होईल, यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. याचाच भाग म्हणून शेतकर्यांना 15 मेपासून कपाशी बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. सेंद्रीय बोंड अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने ही उपाययोजना करण्यात येणार आहे.
राज्यात खरीप 2017 च्या हंगामापासून कपाशी पिकावर सेंद्रिय बोंड आळीचा प्रादूर्भाव दिसत आहे. यासाठी कृषी विभागाने 2018 ते 2024 या कालावधीत राबवलेल्या विविध उपयोजनांमुळे या अळीचा प्रादुर्भाव कमी झाला. मात्र, 2025 च्या हंगामात या अळीचा पुन्हा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी क्षेत्रीय पातळीवर आत्तापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कापूस शास्त्रज्ञांच्या मतानुसार सेंद्रिय बोंड आळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने प्रादूर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. हंगाम पूर्व कापूस लागवड झाल्यास शेंद्री बोंडअळीच्या जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्यास धोका शक्यता अधिक आहे, ही बाब लक्षात घेऊन अनेक उपाययोजनांपैकी एक म्हणून हंगाम पूर्व कापसाची लागवड होणार नाही, यादृष्टीने कृषी विभागाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
यासाठी शेतकर्यांना 15 मेपासून कापूस बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रत्यक्षात कपाशी लागवड ही 1 जूननंतर होईल हे कटाक्षाने पालन केल्यास सेंद्रिय बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रित करणे शक्य होणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाने काटेकोर नियोजन करत अंमलबजावणी करावी, असे आदेश कृषी संचालक यांनी जिल्हास्तरावरील कृषी विभागाला दिले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामातत बीटी कापूस बियाणे पुरवठा कंपन्यांनी 1 ते 10 मे या दरम्यान कपाशी बियाण्याचे मुख्य वितरकांना उपलब्ध करून द्यावे. 10 मे नंतर मुख्य वितरकांनी कपाशी बियाणे किरकोळ विक्रेत्यांना पाठवावेत. यानंतर प्रत्यक्षात शेतकर्यांना कपाशी बियाणे 15 मे पासून उपलब्ध होणार आहे. त्यानंतर 1 जूनपासून कपाशी लागवड सुरू होईल, याकडे लक्ष देण्याच्या सुचना राज्य पातळीवरून जिल्हा पातळीवरील कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत.