Friday, May 3, 2024
Homeनगरशेतकर्‍यांकडील चारा खरेदीचे लवकरच धोरण

शेतकर्‍यांकडील चारा खरेदीचे लवकरच धोरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकर्‍यांकडे उपलब्ध असलेला चारा राज्य सरकार खरेदी करून चारा डेपो सुरू करणार आहे. याबाबत राज्य पातळीवरून लवकरच धोरण जाहीर करण्यात येऊन शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात येणार्‍या चार्‍याचे दर निश्चित करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी वाट न पाहता जिल्ह्यातील चारा खरेदीला सुरूवात करावी. दुष्काळात शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी जे जे शक्य आहे, ते प्रशासनाने करावे, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री विखे बोलत होते. यावेळी विखे पाटील म्हणाले, चारा आणि पाण्याच्या टँकरसाठी प्रशासनाने वॉर रूम सुरू करावे, जिल्ह्यात शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा चारा निर्मितीसाठी वापर करावा, राज्य सरकार टंचाई काळात शेतकर्‍यांकडून चारा उपलब्ध करून तो पशुपालकांना उपलब्ध करून देणार आहे. यंदा जनावरांच्या छावण्या सुरू होणार नाहीत, त्याऐवजी चारा डेपो सुरू करण्यात येणार आहेत.

यासाठी कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाने एकत्रित अभ्यास करून अहवाल द्यावा, शेतकर्‍यांना मुरघास तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे, प्रशासनाने दोन दिवसात जिल्ह्यात आगामी काळासाठी किती चारा उपलब्ध होणार याची माहिती घ्यावी, नगर जिल्हा चारा उत्पादनात मागे राहणार नाही, याची दक्षता अधिकार्‍यांनी घ्यावी, तसेच वैरण विकास व मुरघास संदर्भात शेतकर्‍यांना बियाणे देऊन चारा उत्पादन करण्यात प्रोत्साहित करावे. दूध भेसळ रोखण्यासाठी सरकारने प्राधान्य दिले आहे व वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे या संदर्भात नियोजन करीत आहेत, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी आवर्जून स्पष्ट केले.

अधिकर्‍यांना जादा फोन करू नका

बैठकीत श्रीरामपूरचे आ. लहू कानडे यांनी निळवंडे कालव्याच्या आवर्तनात श्रीरामपूर टेलला आहे. आमच्यावर अन्याय होऊ देवू नका, पाटबंधारे यांच्या अधिकार्‍यांना फोन केल्यास व्यवस्थित माहिती मिळत नाही, असे म्हणताच आ. विखे यांनी आ. कानडे यांना अधिकार्‍यांना जादा फोन करू नका, अन्यथा ते घाबरतात, असे म्हणताच एकच हश्या पिकला.

पाण्याचे नियोजन करा – आ. काळे

सध्या शेतीसाठी धरणातील पाण्याचे ज्याप्रमाणे नियोजन सुरू आहे, ते पाहता पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता कमीच वाटत आहे. पावसाअभावी पाणी कमी असून यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. कोपरगावातील प्रश्न पालकमंत्र्यांनी सोडवावेत, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केली.

पाणीपट्टी न वाढवण्याचा ठराव

शेतकर्‍यांना धरणातून देण्यात येणार्‍या पाण्याची पट्टी न वाढवण्याचा ठराव करण्याच्या सूचना पालकमंत्री विखे यांनी प्रशासनाला दिल्या. टंचाईच्या बैठकीचा संदर्भ देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. मागीलवर्षी धरणातून 15 डिसेंबरपर्यंत पाणी सोडण्यात आले नव्हते. यंदा मात्र परिस्थिती बिकट आहे. यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. धरणाच्या रोटेशनच्या काळात कॅनॉल, चार्‍या फुटणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या