अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भोरवाडी (ता. अहिल्यानगर) शिवारात सोमवारी (19 मे) पहाटे चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. एका शेतकर्याच्या घरात प्रवेश करून सुमारे 11 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह सहा लाख 34 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. या धाडसी घरफोडीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत किरण विश्वनाथ खैरे (वय 38, रा. भोरवाडी, ता. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (18 मे) रात्री 10 वाजल्यापासून ते सोमवारी (19 मे) पहाटे 5.30 च्या दरम्यान घडली आहे. किरण खैरे हे नेहमीप्रमाणे रविवारी रात्री 10 वाजता कुटुंबासह घरात झोपी गेले. संपूर्ण कुटुंब झोपेत असताना चोरट्यांनी मुख्य दरवाजा उघडून घरात प्रवेश केला आणि लाकडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. सदरचा प्रकार पहाटे 5:30 च्या सुमारास लक्ष्यात आला. खैरे यांनी तात्काळ अहिल्यानगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. खैरे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे.
दरम्यान, चोरीस गेलेल्या मालामध्ये चार तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, एक तोळ्याचा सोन्याचे नेकलेस, दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याचे सोन्याचे झुबे व वेल, प्रत्येकी अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या 2 अंगठ्या, प्रत्येकी दोन व चार ग्रॅम वजनाच्या चार जोड सोन्याची फुले, दोन सोन्याच्या तारांमध्ये गुफलेले नथ, सुमारे अर्धा तोळ्याचे लहान मुलाचे कानातील डुल, कुडके, बदाम यांचा समावेश आहे. तसेच तीन हजार रूपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी अहिल्यानगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी पथकासह भेट दिली. तसेच घटनास्थळी डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी तपास केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गिते करीत आहेत.