अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
निमगाव घाना (ता. नगर) येथील एका शेतकर्याच्या घरातून पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण, दोन तोळ्यांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र असा दोन लाख 80 हजार रुपये किंमतीचे सात तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहे. ही घटना रविवारी (16 मार्च) रात्री 11.15 वाजल्यापासून ते सोमवारी (17 मार्च) पहाटे पाच वाजेपर्यंत घडली.
दरम्यान, याप्रकरणी ऊसतोड कामगारावर संशय व्यक्त करण्यात आला असून त्याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब सखाराम तळुले (वय 48, रा. निमगाव घाना, पोस्ट भाळवणी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. रवी जीभाउ माळी (रा. गाळणा, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. रवीने फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत घरात प्रवेश केला. यावेळी त्याने पाच तोळे वजनाचे गंठण आणि दोन तोळे वजनाचे मणी मंगळसूत्र चोरी करून नेले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सदरचा चोरीचा प्रकार फिर्यादी यांच्या सोमवारी पहाटे पाच वाजता लक्षात आला. त्यानंतर फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे. सोमवारी रात्री उशिरा यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.