एकरुखे । वार्ताहर
राहता तालुक्यातील एकरुखे येथे एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रशांत बाळासाहेब गवते असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, गुरुवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकरुखे-राहाता शिवावर वास्तव्यास असलेल्या प्रशांत गवते यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून घटनेची आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशांत गवते यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे घटनेमागील कारणांबाबत तर्कवितर्क करण्याऐवजी पोलिसांच्या तपासातून समोर येणाऱ्या माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेमुळे एकरुखे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.




