सातपूर | प्रतिनिधी Satpur
नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या १४ गावांतील तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २९ मधील चिंचखेड ते दिंडोरी परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात निर्णायक लढा उभारण्याचा इशारा दिला आहे. रिंग रोडच्या अलायमेंट, जमिनींचा मोबदला आणि जमीन खरेदी प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या विरोधात २५ ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच दिवशी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानातून मुंबईच्या आझाद मैदानाकडे पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
कालिका माता मंदिर, मुंबई नाका येथील सभागृहात छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस नाशिक तालुक्यातील १४ गावांतील आणि महामार्ग क्रमांक २९ बाधित भागातील शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत रिंग रोडची अलायमेंट निश्चित करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रक्रियेत सहभागी असलेल्या काही अधिकारी आणि संबंधित कंपनीविरोधात यापूर्वी शासनाकडे पुरावे सादर केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. जर संबंधितांवर कारवाई झाली असेल, तर त्याच अलायमेंटच्या आधारे जिल्हा प्रशासन, प्रांताधिकारी आणि एमएसआयडीसीकडून जमीन खरेदीची प्रक्रिया का सुरू ठेवली जात आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
शेतकऱ्यांनी रिंग रोडच्या अलायमेंटची नव्याने चौकशी करून आवश्यकतेनुसार ती बदलण्याची मागणी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त केल्याचे सांगण्यात आले असून, त्या समितीचा अहवाल जाहीर होईपर्यंत बाधित गावांमध्ये कोणतीही जमीन खरेदी, मोजणी अथवा पुढील कार्यवाही करू नये, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली.
दरम्यान, रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यामध्ये २५ टक्के कपातीची भीती दाखवून दबाव आणला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. “आज जमीन खरेदीसाठी सहकार्य केले नाही तर २५ टक्के मोबदला मिळणार नाही,” अशा प्रकारचे दबावतंत्र वापरले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी तसेच एमएसआयडीसीचे काही अधिकारी शेतकऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. पाथर्डी परिसरातील केवायसी प्रक्रियेबाबतही संभ्रम निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर चौकशी पूर्ण होऊन प्रश्न निकाली निघेपर्यंत एकही शेतकरी जमीन खरेदी प्रक्रियेला सहकार्य करणार नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रशासनाने दबावाचे धोरण न अवलंबता सकारात्मक भूमिका घेऊन प्रश्न सोडवावेत, अशी मागणी करण गायकर यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गोल्फ क्लब मैदानातून मुंबईतील आझाद मैदानाकडे पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच २८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी बाधित महिला शेतकरी त्यांना राखी बांधून आपल्या जमिनी, घरे, शेती आणि संसार वाचविण्यासाठी भावनिक आवाहन करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शासनस्तरावर बैठक घेऊन रिंग रोडच्या अलायमेंट व मोबदल्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत १४ गावांतील जमीन खरेदी प्रक्रिया थांबवावी, तसेच मोबदल्याचा प्रश्न निकाली निघेपर्यंत महामार्ग क्रमांक २९ मधील चिंचखेड ते जोपुळ परिसरातील मोजणीचे काम स्थगित ठेवावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
रिंग रोड प्रकल्पाला विरोध नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, जमिनीच्या न्याय्य मोबदल्यासाठी, पारदर्शक अलायमेंटसाठी आणि बाधित कुटुंबांच्या हितरक्षणासाठी हा लढा सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. शासनाने चौकशी समितीचा अहवाल तातडीने जाहीर करून अलायमेंटची नव्याने तपासणी करावी आणि अंतिम निर्णय होईपर्यंत जमीन खरेदी प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
या बैठकीस छावा क्रांतिवीर सेनेचे नवनाथ शिंदे, सुभाष गायकर, प्रवीण पाटील, वैभव दळवी, शुभम देशमुख यांच्यासह रिंग रोड आणि महामार्ग क्रमांक २९ बाधित परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




