Monday, May 27, 2024
Homeनाशिकपाझर तलावाच्या जमिनीच्या भूसंपादनाने शेतकरी भूमिहीन

पाझर तलावाच्या जमिनीच्या भूसंपादनाने शेतकरी भूमिहीन

पंचाळे | प्रतिनिधी

येथील वडांगळी रस्त्यालगत असलेल्या पाझर तलावासाठी भूसंपादन विभागाने शेतकर्‍यांना पूर्वकल्पना न देता जबरदस्तीने भूसंपादन केले आहे. भूसंपादन खात्याच्या या कारभारामुळे शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या या धोरणामूळे अनेक शेतकरी भविष्यात भूमिहीन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

पंचाळे-वडांगळी रस्त्यालगत पंचाळेपासून पश्चिम उत्तर बाजूस मोठा पाझर तलाव आहे. या पाझर तलावामध्ये कडवा प्रकल्पाचे पाणी चारीद्वारे सोडून त्याचे आरक्षण पांगरी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी करण्यात आले आहे. या तलावातील पाण्याचा परिसरातील शेतकर्‍यांना शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. पाझर तलावासाठी १९८९ मध्ये जमिनी संपादित केल्या होत्या.

त्यावेळी शासनाने सातबारा उतार्‍यावर पाझर तलावाकरता भूसंपादनाच्या नोंदी केलेल्या नव्हत्या. तब्बल ४३ वर्षानंतर भूसंपादन खात्याला जाग येऊन अचानकपणे या पाझर तलावाच्या जमिनीवरील शेतकर्‍यांची नावे रद्द करुन त्याठिकाणी पाझर तलावासाठी भूसंपादन असा शेरा मारण्यात आला आहे. १३ ऑक्टोबरच्या अगोदर अनेक शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर या नोंदी नव्हत्या.

मात्र, अचानक १३ ऑक्टोबरनंतर सदर जमिनी पाझर तलावाकरता वर्ग करण्यात आल्याची नोंद पाहून अनेक शेतकर्‍यांना धक्का बसला. या जमिनी पाझर तलावाकडे वर्ग करण्यास सर्व शेतकर्‍यांनी हरकत घेतली आहे. शासनाने वर्ग केलेल्या जमिनी शेतकर्‍यांना परत द्याव्यात अशी मागणी संतप्त शेतकर्‍यांनी केली आहे.

पंचाळे येथील या गटातील व मालकीच्या मिळकती असून सदर मिळकती १५ ऑक्टोबरपर्यंत शेतकर्‍यांच्या ताब्यात होत्या. मात्र, शासनाने आता भूसंपादन अधिकार्‍याकडील प्रस्तावानुसार येथील क्षेत्र पाझर तलावाकरता संपादित झाल्याची नोंद टाकली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या