समाधान ठाकरे
दोंडाईचा । dondaecha
कापसाला चांगला (Cotton price) भाव मिळत नसल्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील शेतकर्यांनी घरांमध्ये कापूस साठवून (storing cotton) ठेवला आहे. परंतू कापसामध्ये किडे (Worms prepared) तयार होत असून पिसवांमुळे (fleas) शेतकर्यांच्या (farmers) आरोग्याला धोका (Health hazard) निर्माण झाला आहे. यामुळे खाज येण्याचा आजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कापसामुळे त्वचा रोगासह विविध आजार शेतकर्यांना होत आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील कापसाला समाधानकारक दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती. फेब्रुवारी अखेरपर्यंत दर वाढतील या अपेक्षेने शेतकर्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र, आता मार्च महिना उलटत आला तरी भाववाढ मिळण्याची शक्यता नाही. यामुळे घरात साठवून ठेवलेला कापूस आता शेतकर्यांच्या जीवावर उठले असल्याचे दिसून येत आहे.
त्वचा रोगासह विविध आजार शेतकर्यांना होत असल्याने सरकारने यावर काही तरी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. साठवून ठेवलेल्या कापसामुळे अंगाला खाज वाढण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून ग्रामीण भागात या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. कापसाला जास्त भाव मिळत नसल्यामुळे विकता देखील येत नाही तर दुसरीकडे त्यांच्यातील पिसवांमुळे अंगाला सुटणार्या खाजमुळे कापूस घरात ठेवायलाही आता शेतकरी तयार नसल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत.
खाजेच्या समस्येमुळे शेतकरीही कंटाळले असून अनेक ठिकाणी शेतकर्यांनी या त्रासामुळे कापूस विक्री करण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकरी घरात कापूस असल्याने रात्रीच्या वेळेस थंडीतही घराबाहेर झोपणे पसंत करत आहेत. अनेक संकटांचा सामना करून पांढरे सोने शेतकर्यांनी पिकविले. परंतु, माल हाती येताच बाजारातील दर उतरले. परिणामी आता कापूस घरात ठेवावा तर त्याला पिसवा लागतो आणि बाजारपेठेत भाव मिळत नाही, अशा द्विधा मनःस्थितीत शिंदखेडा तालुक्यातील कापूस उत्पादक अडकला आहे.
अनेकांच्या नजरा आता दरवाढीकडे लागल्या आहेत. प्रारंभी कापसाला 11 हजार रुपयांचा भाव मिळाला. मात्र 11 हजारांवरून हे दर सात हजार पाचशे रुपयांपर्यंत आले आहेत. दरवाढीच्या आशेवर शेतकर्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे. मात्र दिवसेंदिवस कापसाचे भाव कमी होत आहेत. अपेक्षेप्रमाणे कापसाला भाव मिळत नसल्याने कापसाच्या तीन-चार महिन्यांपासून भाव वाढतील या अपेक्षेने साठवणूक करून ठेवलेल्या ढीग प्रत्येक घरात पाहायला मिळत आहे.
दरवाढीची प्रतीक्षा असमानी संकटाचा सामना करत कापसाचे उत्पन्न घेतले कापसाच्या दरात वाढ होईल. या आशेने कापूस साठवून ठेवला आहे. मात्र दर वाढ होत नाही याशिवाय घरात साठवून ठेवलेले कापसात कीड प्रादुर्भाव झाला आहे. घरातील सदस्यांचे आरोग्य बाधा निर्माण होत आहे. कापसाला दर वाढ मिळेल याची प्रतीक्षा आहे.
मनोज उर्फ रावसाहेब पाटील, शेतकरी