Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यापुरे झाले द्राक्ष पुराण, आता पीक पद्धतीच बदलू

पुरे झाले द्राक्ष पुराण, आता पीक पद्धतीच बदलू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

द्राक्ष शेतीत लावलेला पैसाही यंदा निघाला नाही. मग घरखर्च कसा भागवायचा़? कर्ज तरी किती घ्यावे ? अन् ज्या शेतीच्या जोरावर कर्ज घेतले तिच तोट्यात आल्यावर फेडावे तरी कसे ? असे प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांपुढे आहेत. यामुळे शेतकरी पीक पद्धतीच बदलण्याच्या निर्णयापर्यंत आले आहे. तसे झाल्यास नाशिकची वाईन कॅपिटल, द्राक्षपंढरी म्हणून असलेली ओळख पुसली जाण्याची भीती आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात अनेक शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतात. मात्र, ऐन हंगामात निर्यात प्रक्रिया लॉकडाउनच्या फटक्यात सापडली. निर्यात होणारे देश लॉकडाऊन आहेत. स्थानिक बाजारपेठांत द्राक्षाला मातीमोल भाव आहे. यामुळे गेल्या चार वर्षांपासून द्राक्ष शेतकरी संकटात आहे. अशा परिस्थितीत आता बागायतदार शेतकरी हतबल झाले असून ते पीक पद्धत बदलण्याच्या तयारीत आहेत.

भांंडवलाशिवाय शेती होत नाही, शेतीत आधी पैसा पाण्यासारखा ओतावा लागतो तेव्हाच कुठे चांगल्या प्रतीचे उत्पन्न घेणे शक्य होते. यामुळे सध्याच्या कोलमडलेल्या बाजारपेठेमुळे े द्राक्ष हंगामाचे गणित सलग चौथ्या हंगामातही बिघडवले आहे.

राज्यातील एकूण द्राक्ष उत्पादनांपैकी नाशिकचा वाटा 91 टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्र 58 हजार 367.43 हेक्टर क्षेत्र आहे. मागील वर्षी शेतकर्‍यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निर्यातक्षम माल पिकविला होता. लॉकडाऊन असतानाही जागेवर 90 रुपये दराने द्राक्षांची विक्री झाली होती. मागील वर्षी अवकाळीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले होते.

परंतु भाव बरा मिळाला होता त्यामुळे खर्च काढणे शक्य झाले होते. यंदाही काही प्रमाणात अवकाळीचा पावसाचा फटका शेतकर्‍यांना बसला. थंडीत अचानकपणे वाढ झाल्यानेही काही ठिकाणी द्राक्षांना तडे पडले होते. दरवर्षी काही ना काही अडचणी शेतकर्‍यांसमोर येतात. काबाड कष्ट करून पाहिजे तितका मोबदला मिळत नाही. मजूरटंंचाई, वाहतूक, आवश्यक पॅकिंग साहित्य, व्यापार्‍यांची कमतरता, लॉकडाऊनच्या नावाखाली शेतकर्‍यांच्या मालाची मातीमोल किंमत यामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे.

उसाकडे वळावे का?

गेली अनेक वर्षे द्राक्ष लागवड करत आहे. परिस्थिती द्राक्षांनीच सुधारली. मात्र, आता द्राक्षशेती परवडत नाही. महामूर खर्च करून पैसे अडकवून आपला खर्च झालेल्या पैशांमध्येही तुट निर्माण होत असेल तर द्राक्षशेती यापुढे करणे सोडून द्यावे असे वाटते. द्राक्षाला पर्याय म्हणून ऊस लागवड केली तर काय वाईट, यामध्ये तर मेहनत कमी असते. त्यामुळे शेतीत आता द्राक्षे नव्हे तर ऊस दिसतील.

सुरेश कळमकर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मोहाडी (ता. दिंडोरी)

शासनस्तरावर प्रयत्न व्हावे

शासनाने इथल्या निर्यातक्षम मालासाठी वेगळी योजना लागू केली पाहिजे. द्राक्षांचे बॅ्रंडींग झाले पाहिेजे. नवनव्या वाणांवर संशोधन झाले पाहिजे. कमीत कमी खत खाद्यांमध्ये उच्च प्रतीचे द्राक्षे कशी उत्पादन केली जातील याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. असे केल्यावर नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष शेती टिकेल. अन्यथा नाशिकमध्ये द्राक्षांची शेती होत होती, हे येणार्‍या पिढीला सांगावे लागेल.

वाईनसारखा पुरक उद्योग संकटात

नाशिकमध्ये द्राक्षांचे उत्पादन अधिक होते. द्राक्षांपासून तयार करण्यात येणार्‍या वाईनसाठी सुगीचे दिवस आधी इथे होते. मात्र, गेल्या काही दिवसांत बोटावर मोजता येणार्‍या वाईनरी शिल्लक राहिल्या आहेत. वाईन ग्रेप्स उचलले जात नाहीत. वाईन कंपनीकडून 100 टक्के माल उचलला जाण्याचा करार असताना ऐनवेळी अर्धा माल उचलला जातो. यामुळे उर्वरीत अर्ध्या मालाची विल्हेवाट कशी लावायची. यामुळे होणारा तोटा शेतकर्‍यालाच होतो. व्यवसाय करणार्‍या एक दोन वायनरी सोडल्या तर इतर बंद झालेल्या अवस्थेत आहेत. तसेच बेदाणास दर नाही. यामुळे बेदाणेही करता येत नाही. द्राक्ष या पिकासंदर्भात असलेले पुरक उद्योग संकटात आहेत.

पीक विमा मिळाल्याची उदाहरणे दुर्मिळ

द्राक्षाला पीक विमा लागू आहे. परंतु त्याचे निकष वातानुकूलीन कँबीनमध्ये बसून तयार केले आहेत. यामुळे शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळाल्याची उदाहरणे शोधावे लागतील. पर्यायाने अनेक शेतकरी पीक विमाही काढत नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या