Monday, November 16, 2026
HomeनगरAhilyanagar : 58 हजार 731 शेतकर्‍यांचे फार्मर आयडी अद्याप बाकी

Ahilyanagar : 58 हजार 731 शेतकर्‍यांचे फार्मर आयडी अद्याप बाकी

जिल्ह्यात 94.25 टक्के अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

केंद्र शासनाच्या अ‍ॅग्रीस्टॅक अभियानांतर्गत शेतकर्‍यांना फार्मर आयडी देण्याच्या कामाने नगर जिल्ह्यात वेग घेतला आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये 10 लाख 22 हजार 273 शेतकर्‍यांचे फार्मर आयडी तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 9 लाख 63 हजार 542 शेतकर्‍यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीची टक्केवारी 94.25 वर पोहोचली असून, अद्याप 58 हजार 731 शेतकर्‍यांची नोंदणी बाकी आहे. दरम्यान, यंदाच्या नुकसानभरपाईपोटी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीसाठी फार्मर आयडी महत्त्वाचा ठरल्याने उर्वरित शेतकर्‍यांचे आयडी तयार करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

- Advertisement -

अ‍ॅग्रीस्टॅक अभियानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांची जमीन, पीक आणि इतर आवश्यक माहिती एकत्रित करून त्यांना स्वतंत्र डिजिटल ओळख उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणांकडून नोंदणीचे काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांनी निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक नोंदणी केली आहे. अकोले तालुक्याने 109.90 टक्के काम पूर्ण करीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ श्रीगोंदा 105.41 टक्के, पारनेर 104.69 टक्के आणि जामखेड तालुक्याने 102.68 टक्के नोंदणी केली आहे.

दुसरीकडे कर्जत तालुक्यात 97.60 टक्के, राहाता 95.68 टक्के, श्रीरामपूर 95.65 टक्के, कोपरगाव 92.73 टक्के आणि संगमनेर तालुक्यात 91.75 टक्के काम पूर्ण झाले आहे. पाथर्डी तालुक्याची प्रगती 90.14 टक्के, राहुरी 89.01 टक्के, शेवगाव 87.42 टक्के, नेवासा 84.78 टक्के अशी आहे. नगर तालुका मात्र 82.44 टक्क्यांसह जिल्ह्यात सर्वांत मागे आहे. जिल्ह्याची एकूण प्रगती 94 टक्क्यांवर पोहोचली असली, तरी उर्वरित शेतकर्‍यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. विशेषतः कमी प्रगती असलेल्या तालुक्यांमध्ये नोंदणीचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे.

शासकीय योजनांसाठी अ‍ॅग्रीस्टॅक आवश्यक
राज्यातील शेतकर्‍यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक तसेच अन्य विभागांच्या योजनांचा लाभ थेट मिळावा, यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक प्रणालीतील माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कृषी व अन्य विभागांच्या विविध योजनांची मदत शेतकर्‍यांपर्यंत सातत्याने पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून फार्मर आयडी प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अकोले, श्रीगोंदा, पारनेर आणि जामखेड या चार तालुक्यांची शंभर टक्क्यांपुढे मजल
अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणीमध्ये अकोले, श्रीगोंदा, पारनेर आणि जामखेड या चार तालुक्यांनी शंभर टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये अकोले तालुका 109.90 टक्के नोंदणीसह जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. या चार तालुक्यांनी उद्दिष्टापेक्षा अधिक नोंदणी केल्याने जिल्ह्याच्या एकूण प्रगतीत भर पडली आहे.

शहरीकरणाच्या पट्ट्यातील तालुके पिछाडीवर
नगर शहरालगतचा परिसर, शिर्डी तसेच अन्य शहरीकरणाच्या प्रभावाखालील गावांमध्ये फार्मर आयडी नोंदणीचे काम तुलनेने मागे असल्याचे दिसून येत आहे. या भागांमध्ये अनेक ठिकाणी सातबारा उतार्‍यावर शेतीची नोंद असली, तरी प्रत्यक्षात त्या जमिनींवर बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे महसूल अभिलेखातील शेतजमिनींचे खातेदार आणि प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी यांच्या संख्येत तफावत निर्माण होत आहे. परिणामी, अभिलेखातील एकूण खातेदारांच्या तुलनेत शंभर टक्के फार्मर आयडी तयार होणे शक्य नसल्याचे महसूल विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

डांबून ठेवलेल्या 8 गोवंशीय जनावरांची सुटका

0
गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi नेवासा तालुक्यातील चांदा येथे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या आठ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली. या कारवाईत सुमारे 1 लाख...