Friday, July 3, 2026
HomeनगरAhilyanagar : शेतकर्‍यांच्या कर्जमाफी प्रक्रियेला वेग

Ahilyanagar : शेतकर्‍यांच्या कर्जमाफी प्रक्रियेला वेग

1 लाख 92 हजार पात्र शेतकरी खात्यांचा तपशील पोर्टलवर अपलोड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य शासनाने शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे तसेच शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील 1 लाख 92 हजार 282 पात्र शेतकरी खातेदारांचा तपशील शासनाच्या पोर्टलवर अपलोड केला आहे. सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने योजनेची पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी होऊन पात्र शेतकर्‍यांना तातडीने लाभ मिळावा, यासाठी बँकेला खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

- Advertisement -

त्यानुसार, 28 जूनअखेर बँकेने 99.84 टक्के पात्र कर्जदार खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
नेवाशात सर्वाधिक, सर्वात कमी कोपरगावात

तालुकानिहाय अपलोड करण्यात आलेल्या पात्र खात्यांची संख्या पुढीलप्रमाणेअकोले 10 हजार 478, जामखेड 9 हजार 631, कर्जत 12 हजार 305, कोपरगाव 3 हजार 959, नगर 9 हजार 425, नेवासा 26 हजार 99, पारनेर 9 हजार 488, पाथर्डी 8 हजार 920, राहुरी 16 हजार 347, राहाता 6 हजार 718, शेवगाव 15 हजार 748, संगमनेर 11 हजार 86, श्रीगोंदा 41 हजार 383 आणि श्रीरामपूर 10 हजार 695. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पात्र शेतकर्‍यांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत असून, उर्वरित खात्यांची माहितीही लवकरच अपलोड करण्यात येणार आहे.

कर्जमुक्तीची प्रक्रिया ऑनलाईन; आधार प्रमाणिकरण अनिवार्य
राज्य शासनाकडून ‘महाआयटी’च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित राबविली जात आहे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेले व अ‍ॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून, संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. या याद्या शेतकर्‍यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, पात्र शेतकर्‍यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकांमार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...