Sunday, June 14, 2026
HomeनगरShrirampur : पोलिसावर ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला

Shrirampur : पोलिसावर ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला

चोरीच्या तपासादरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील धक्कादायक घटना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरात चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस कर्मचार्‍यांवर ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना श्रीरामपूर तालुक्यातील कमलपूर येथे घडली. या हल्ल्यात पोहेकॉ. प्रसाद साळवे हे गंभीर जखमी झाले असून, मदतीला धावून आलेल्या एका नागरिकालाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी लक्ष्मीकांत काळु मुंजाळ (वय 20, रा. कमलपूर) याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. 1103/2025 अन्वये टाटा कंपनीचा टेम्पो 709 चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल असून, त्याचा तपास गुन्हे शोध पथकाकडून सुरू होता. याच गुन्ह्याच्या तपासादरम्यान 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी गुप्त बातमीदाराकडून चोरीस गेलेला मुद्देमाल संशयित आरोपी लक्ष्मीकांत मुंजाळ याच्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पो.कॉ. अजित अशोक पटारे व पोहेकॉ. प्रसाद साळवे यांनी कमलपूर येथे सापळा रचला. सकाळी साडेआठच्या सुमारास आरोपी हा निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीत वाळू व दूध कॅन घेऊन दुध डेअरीकडे येत असताना पोलिसांनी त्याला थांबवून ओळख सांगत चौकशीसाठी खाली उतरण्यास सांगितले.

मात्र आरोपीने अचानक ट्रॅक्टर सुरू करून, मला अडवले तर तुम्हाला ट्रॅक्टरखाली चिरडून टाकीन अशी धमकी देत पोलिसांच्या दिशेने ट्रॅक्टर भरधाव चालवला. यामध्ये पोहेकॉ. साळवे यांच्या अंगावर ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा उजवा हात चाकाखाली येऊन ते रक्तबंबाळ झाले, तर पाय व शरीरालाही गंभीर दुखापत झाली. याच वेळी मदतीला धावून आलेले बाबा इमाम सय्यद (रा. टाकळीभान) यांनाही ट्रॅक्टरचा धक्का बसून डोके व पायाला मार लागला व ते बेशुद्ध पडले.

प्रसंगावधान राखत पो.कॉ. अजित पटारे यांनी झटापटीत ट्रॅक्टरवर चढून ब्रेक दाबत वाहन थांबवले व आरोपीस ताब्यात घेतले. जखमींना तातडीने श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी आरोपी लक्ष्मीकांत काळु मुंजाळ याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा, पोलिसांवर हल्ला व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...