अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
वैवाहिक वादातून सासर्याने सूनेला लाकडी काठी व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा तसेच तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सावेडी परिसरात शुक्रवारी (15 जानेवारी) रात्री घडला आहे. याप्रकरणी पीडितीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात सासरा व पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीचे सासर अहिल्यानगर शहरातील सारसनगर असून त्यांचे पतीसोबत वाद झाल्यामुळे त्या सध्या माहेरी सुरत (गुजरात) येथे राहतात. वादामुळे पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. दरम्यान, गुरूवारी (15 जानेवारी) फिर्यादी या आपला मुलगा व आईसह सावेडी येथे मावशीकडे आल्या होत्या. शुक्रवारी रात्री त्यांना पतीने फोन करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास सासरे हे मावशीच्या घरी आले व काहीही कारण नसताना शिवीगाळ करत लाकडी काठीने फिर्यादीला मारहाण केली.
आरडाओरड झाल्यानंतर फिर्यादीची आई, मावशी व काका हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता, सासर्याने फिर्यादीच्या आईला काठीने मारून तिला ढकलून दिले. तसेच फिर्यादीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी मावशी व काकांनाही लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करण्यात आली. माझ्या नादी लागलात तर मारून टाकीन, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन संशयित तेथून निघून गेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या सर्वांनी जिल्हा रूग्णालयात उपचार घेतले असून, त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पती व सासर्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




