जगभरातील वडिलांना, बाबांना, पित्यांना समर्पित असणारा ‘फादर्स डे’ नेहमीप्रमाणेच ‘जन्मदाता, पालनकर्ता, विराट वटवृक्ष’ अशा प्रकारच्या उपमा देत साजरा झाला. या सर्व उपाधींच्या पलीकडे जाऊन जगाच्या कानाकोपर्यामध्ये वसलेले बाबा स्वतःला नेहमीच एक प्रश्न विचारताना दिसतात की, संगोपनातील, मुलाबाळांच्या पालनपोषणातील आमच्या भूमिकेचे अस्तित्व-औचित्य मर्यादित का ठेवले जाते? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचेही आहे.
कुटुंबाचा आर्थिक संरक्षणकर्ता इथवरच पित्याची भूमिका मर्यादित ठेवण्याची ही शतकानुशतके चालत आलेली मानसिकता वडीलकीच्या नात्याने हळुवारपणाने मुलाबाळांना जपणार्या पित्याचे भावविश्व नाकारते. खरे पाहता मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये वडिलांचे योगदान मोलाचे असते. त्याकडे होणार्या दुर्लक्षाचे बालमानसोपचारतज्ज्ञ मायकेल लॅब यांनी ‘फॉरगॉटन काँट्रिब्युटर्स टू चाईल्ड डेव्हलपमेंट’ असे म्हणत विश्लेषण केले आहे. सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तने होऊनही बहुतांश मानसोपचारतज्ज्ञ, बालहक्क-अधिकारांचे संरक्षणकर्ते किंवा बालविकासाशी संबंधित धोरणे पित्याचे अस्तित्व मातेच्या तुलनेत गौण मानतात. किंबहुना, शिशूच्या सामाजिक विश्वामध्ये पित्याचे स्थान जवळपास नगण्य असल्याचेच मानले जाते, असे म्हटल्यास गैर ठरणार नाही.
अनेक वर्षांपासून आई आणि बाळाचे संबंध अद्वितीय आहेत आणि कोणत्याही परस्परसंबंधांच्या तुलनेत ते सर्वश्रेष्ठ आहेत असेच मानले गेले. वास्तविक, कुटुंबाचा पालनकर्ता म्हणून वडिलांकडून पार पाडल्या जाणार्या भूमिकेबाबत, जबाबदार्यांबाबत संशोधनाचा अभाव असल्यामुळे हे अर्धसत्य प्रचलित होत गेले. प्रत्यक्षात अशी हजारो उदाहरणे भोवताली आहेत ज्यामध्ये आईप्रमाणेच वडीलही आपल्या मुलांच्या सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
आकडेवारीचाच आधार घ्यायचा झाल्यास आजघडीला अमेरिकेमधील 35 लाखांहून अधिक मुले एकल पित्यासोबत राहत आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलनच्या एका विश्लेषणानुसार 2018 ते 2023 याकाळात मुलांची देखभाल करण्यासाठी रजा घेणार्या पित्यांच्या संख्येमध्ये जवळपास तीन पटींहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कार्यस्थळापासून दूर राहिल्यामुळे आपल्या नोकरीवर संक्रांत येऊ शकते, याची जाणीव असूनही या पित्यांनी संगोपनातील आपली भूमिका निभावण्यासाठी अशा रजा घेण्याला प्राधान्य दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे, जून 2017 मध्ये युनिसेफने ‘सुपर डॅडस्’ नावाचे एक अभियान सुरू केले होते. त्याचा उद्देश मुलांच्या प्रारंभिक विकासामध्ये असणार्या वडिलांच्या भूमिकेवर प्रकाशझोत टाकणे हा होता. या अभियानाअंती युनिसेफने केलेल्या विश्लेषणामध्ये असे म्हटले आहे की, मुलांच्या विकासामध्ये पित्याची भूमिका ही आईपेक्षा जराही कमी नसते. वडील जेव्हा आपल्या शिशूसोबत, बाळासोबत अगदी जन्मापासूनच जोडले जातात तेव्हा मुलांच्या विकासामध्ये त्यांच्याकडून सक्रिय भूमिका निभावली जाण्याची शक्यता अधिक असते. अशा पित्यांकडून मुलांना भविष्यात मानसिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या अधिक आधार, समाधान आणि तृप्ती मिळते. भविष्यात मुलांच्या वाटचालीवर याचा सकारात्मक परिणाम होतो. ‘डू फादर्स मॅटर- व्हॉट सायन्स इज टेलिंग अस अबाऊट पेरेंटस् वी हॅव ओव्हरलूकड्’ या पुस्तकामध्ये पाल रायबर्न यांनी पित्याच्या भूमिकेचे गांभीर्याने आणि विस्ताराने विश्लेषण केले आहे. त्यांनी दुसर्या महायुद्धातील मुलांचे उदाहरण यासाठी दिले आहे. त्यावेळी अनेक वडिलांना आपल्या मुलांना बाल्यावस्थेत सोडून युद्धभूमीवर जावे लागले होते किंवा विस्थापित व्हावे लागले होते. रायबर्न सांगतात की, जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळात ज्या मुलांना पित्याचे प्रेम, संरक्षण, पाठबळ लाभले नाही अशा मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता दिसून आली. सामाजिक एकीकरणाच्या किंवा समाजाशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेमध्येही अशी मुले पिछाडीवर राहिल्याचे दिसून आले. अलीकडील काळात ब्रिटनमधील धोरणे पाहिल्यास पितृत्व या संकल्पनेला अधिक महत्त्व देण्याबाबत तेथील सरकार उत्साही असल्याचे दिसून आले आहे. तसेच प्रसूतीनंतरच्या काळात पित्यांनीही सहभागी राहिले पाहिजे, आपले योगदान दिले पाहिजे या संकल्पनेशी सुसंगत भूमिका घेताना दिसत आहे.