नाशिक | प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांच्या विरोधात अन्न औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिकच्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी सापळा रचून सिन्नर एमआयडीसी येथे एका दुध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणार्या मे. यशवी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस, मुसळगाव एमआयडीसी, सिन्नर येथे गुरवारी (दि.११) सायंकाळी धाड टाकली असता त्याठिकाणी भेसळयुक्त पनीरचे उत्पादन विक्रीसाठी सुरु असल्याचे आढळले.
त्याअनुषंगाने अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायदयांतर्गत सखोल तपासणी केली असता त्याठिकाणी पनीर बनवितांना रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर , ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर करतांना आढळल्याने सुवर्णा महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित पनीरचा एकूण साठा ३१४ किलो (किंमत ५३ हजार ३८० रु.) नमुना घेवून जप्त केला. तसेच पनीर बनविण्यासाठी घटनास्थळी असलेल्या रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा साठा नमुने घेवून जप्त केला आहे.
सदरचे संशयित भेसळयुक्त पनीर हे नाशवंत असल्याने ते घटनास्थळीच मानवी सेवनास जावू नये याकरीता नष्ट केले. सदरची कारवाई ही सह आयुक्त नाशिक विभाग शैलेश आढाव यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) उदयदत्त लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, योगेश देशमुख, नमुना सहायक विकास विसपुते, वाहनचालक साबळे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
सदर प्रकरणी घेतलेले नमुने हे अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले असून अहवाल अदयाप प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच संबधीतांवर कार्यालयामार्फत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा