अहिल्यानगर (प्रतिनिधी)
तालुक्यातील मेहकरी व मराठवाडी शिवारातील काही दूध संकलन केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (10 जुलै) छापेमारी करत भेसळीच्या संशयावरून दूधाचे नमुने तपासणीसाठी जप्त केले. नाशिक आणि अहिल्यानगर येथील अधिकार्यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.
राज्यभर हॉटेल, दूध संकलन केंद्रे, स्वीट मार्ट आणि अन्य खाद्य व्यावसायिक आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी मोहीम सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून मेहकरी व मराठवाडी परिसरातील काही दूध संकलन केंद्रांमध्ये भेसळ होत असल्याची तक्रार नाशिक येथील सह आयुक्तांकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत सह आयुक्त स्वतः आपल्या पथकासह शुक्रवारी अहिल्यानगरमध्ये दाखल झाले.
स्थानिक सहायक आयुक्त आणि अन्न सुरक्षा निरीक्षकांच्या मदतीने पाच ते सात दूध संकलन केंद्रांची तपासणी करण्यात आली. विविध ठिकाणांहून दूधाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतरच भेसळ झाली आहे की नाही, तसेच संबंधितांवर कोणती कारवाई होणार याबाबत स्पष्टता येणार आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नव्हती. या कारवाईमुळे अहिल्यानगर तालुक्यातील दूध संकलन केंद्रे, हॉटेल, स्वीट मार्ट आणि इतर खाद्य व्यावसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परवाना निलंबनावरून सहायक आयुक्तांवर नाराजी
अहिल्यानगर येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात तीन सहायक आयुक्त कार्यरत असून त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार कामकाज सुरू आहे. मात्र, तपासणीच्या नावाखाली काही सहायक आयुक्तांकडून विनाकारण त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी दूध संकलन केंद्र चालक व हॉटेल व्यावसायिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, सर्व नियमांचे पालन करूनही किरकोळ कारणांवर परवाने निलंबित करण्याची कारवाई केली जाते. याविरोधात अनेकांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रारी दाखल केल्या असून काही दूध संकलन केंद्र चालकांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाकडून मात्र या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.




