अहिल्यानगर (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील मे. साई जतिन दूध संकलन केंद्राचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी आणि ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच अन्न सुरक्षा व मानके नियम व विनियम 2011 अंतर्गत सुरू असलेल्या नियमित तपासणी मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अहिल्यानगर कार्यालयातील सहायक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी गुरूवारी (9 जुलै) सावळीविहीर खुर्द येथील संबंधित दूध संकलन केंद्राची पाहणी केली. यावेळी डम्प टँकमधील लूज गायीचे दूध तसेच स्टोरेज टँकमधील लूज गायीचे दूध यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
तपासणीदरम्यान आस्थापनातील स्वच्छता, कार्यपध्दती तसेच नाकारण्यात आलेल्या अन्नपदार्थांच्या अहवालाचा विचार करण्यात आला. या सर्व बाबींच्या आधारे संबंधित व्यवसाय सुरू राहिल्यास ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी) विनियम 2011 मधील विनियम नुसार व्यापक जनहित आणि जनआरोग्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापनेचा परवाना तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अन्नपदार्थाबाबत भेसळीचा संशय अथवा तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




