Thursday, November 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकमध्ये पाच मिठाई उत्पादकांवर एफडीएची कारवाई

नाशिकमध्ये पाच मिठाई उत्पादकांवर एफडीएची कारवाई

अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव असल्याने पाचही आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सणासुदीच्या काळात मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकां विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई केली आहे. नाशिक शहर व जिल्ह्यातील पाच मिठाई उत्पादक आस्थापनांमध्ये तपासणीदरम्यान अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आल्याने संबंधित आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.या कारवाईमुळे मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या सण उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत ही तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने तसेच सहायक आयुक्त विनोद धवड, संदीप देवरे आणि दिनेश तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरासह जिल्ह्यातील मिठाई उत्पादक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी काही ठिकाणी अन्नपदार्थ तयार करण्याच्या जागेत अस्वच्छता, झुरळांचे अस्तित्व तसेच अन्न सुरक्षा व मानके नियमांतील अनुसूची चारमधील तरतुदींचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाच आस्थापनांविरोधात थेट परवाना निलंबनाची कारवाई केली. यामध्ये देवळाली कॅम्प येथील मे. सिर्वी स्वीट्स, अशोका मार्गावरील मे. कृष्णा सागर स्वीट्स, तिडके कॉलनीतील मे. पंचम स्वीट्स, ओझर बसस्थानकाजवळील मे. साई बिकानेर स्वीट्स आणि भगूर येथील मे. उत्तम फरसाण अँड स्वीट्स या आस्थापनांचा समावेश आहे.

सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत अन्नपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आणि झुरळांचा प्रादुर्भाव असणे ही ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. अन्न तयार करताना व हाताळताना स्वच्छता राखणे, उत्पादन परिसर कीटकमुक्त ठेवणे आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे पालन करणे प्रत्येक व्यावसायिकासाठी बंधनकारक आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक, अश्विनी पाटील, प्रतीक भड आणि ऋतुजा नवले यांच्या पथकाने केली. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात यापुढेही नियमित तपासणी करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा सुरक्षिततेबाबत संशय असल्यास नागरिकांनी संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मिठाई उत्पादक व विक्रेत्यांनी आवश्यक परवाने घेऊनच व्यवसाय करावा आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना डबल दिलासा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 लाख 43 हजार 293 शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर आतापर्यंत 1 हजार 369 कोटी 69...