Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकबिबट्याचा मुक्त संचार; शेतकऱ्यांमध्ये दहशत

बिबट्याचा मुक्त संचार; शेतकऱ्यांमध्ये दहशत

दहिवड | प्रतिनिधी

देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील कुंभार्डे, गिरणारे, सांगवी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. कुंभार्डे येथे दोन दिवसात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बैलासह दोन वासरु ठार झाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

कुंभार्डेसह गिरणारे, सांगवी परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे दृष्टीस पडल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याने आता पशुधनावर हल्ले करण्यास प्रारंभ केला आहे. कुंभार्डे शिवारातील गोविंद रामभाऊ ठाकरे यांच्या शेतात घरालगत बांधलेल्या शेडमधील बैलावर बिबट्याने हल्ला चढवित त्यास ठार केले.

सकाळी बिबट्याच्या पावलाचे ठसे निदर्शनास आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी गावालगत राहणाऱ्या देवीदास दादाजी ठाकरे यांच्या घराजवळ बांधलेले वासरु बिबट्याने हल्ला चढवित फस्त केले तर जयरामवाडी शिवारात भगवान नारायण ठाकरे यांच्या वासरुवर बिबट्याने हल्ला चढवित त्याचा फडशा पाडला.

दोन दिवसात तीन जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याने पशु पालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे वनपाल देविदास चौधरी, ज्योती सोनवणे यांनी घटनास्थळी जावून मृत जनावरांचा पंचनामा केला. गत काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार वाढला आहे.

रब्बी हंगामामुळे शेतात कामे सुरू आहेत. त्यातच बिबट्याचे दर्शन घडत असल्याने शेतमजुर कामावर येण्यास धजावत नाही. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या भागात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकर्‍यांसह ग्रामस्थांतर्फे केली जात आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या