श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे… क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे…
मित्रांनो ! त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी यांची सर्वांना आवडणारी व श्रावण महिन्यात कायमच लक्षात राहणारी सुंदर कविता. ही निसर्ग कविता पाठ्यपुस्तकातून आपण वाचल्या असतील. निसर्ग कवी, बालकवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 रोजी खान्देशात झाला. त्यांचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे. कापूस आणि केळी ही मुबलक उत्पादने, काळी कसदार माती असलेला महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात… महाभारत काळातील कथांचाही खान्देशचा संबंध आहे, असे संदर्भ सापडतात. प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी खान्देशच्या, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर पारोळ्याचे… याच खान्देशात त्याकाळी धरणगाव हे खेडे जळगावपासून जवळ अशा या लहान लहानशा गावात बालकवी यांचा जन्म झाला. बालकवी यांना चार भावंडे होती. मनुताई (जिजी), अमृतराव, कोकिळा आणि भास्कर (बाबू) या भावंडांत बालकवी यांचा क्रमांक तिसरा. त्यांचे वडील पोलीस खात्यात फौजदार होते. त्यांचे नाव बापूराव आईचे नाव गोदूबाई उत्तम गृहिणी आणि अध्यात्मिक प्रवृत्तीच्या होत्या. अतिशय सर्वसाधारण असे हे कुटुंब होते.
बालपणापासूनच त्यांना निसर्गाची प्रचंड ओढ. नदीकिनारी जाऊन शांतपणे निसर्गाची रूपे न्याहाळणे हा त्यांचा छंद. 1903 साली बालकवी यांचे मराठी शिक्षण संपले. इंग्रजी शिक्षणासाठी ते धुळ्याला गेले, पण तिथे वर्षभरच राहिले. वयाच्या 13 व्या वर्षीच त्यांनी पहिली कविता लिहिली. पुढे ते राष्ट्रीय शाळेत शिक्षण घेऊ लागले. तो काळ देशभक्तीने भारलेला होता…
बालकवी यांनी काही सामाजिक कविताही लिहिल्या. वयाच्या 15 व्या वर्षी राष्ट्रीय कीर्तनकार श्री रा. कृ. वैद्य उर्फ वनवासी यांचा सहवास त्यांना लाभला. त्या काळात त्यांनी काही कविता लिहिल्या पण त्या प्रासंगिक, बाळबोध अशा होत्या. 17 व्या वर्षी त्यांच्या जीवनात एक अतिशय महत्त्वाची घटना घडली. जळगाव येथे 1907 साली कविसंमेलन झाले. या संमेलनात बालकवी यांनी ही आपली कविता सादर केली ‘अल्पमती मी बालक नेणे काव्याशास्त्रव्युत्पत्ती…’ ही कवितेची पहिली ओळ. जमलेल्या मोठमोठ्या कवींनी त्यांचे खूपखूप कौतुक केले, शाबासकी दिली. संमेलनाचे अध्यक्ष कर्नल कीर्तिकर आणि रेव्ह. टिळक यांनी त्यांना बालकवी हा किताब दिला व त्यांना काव्य लेखनासाठी खूप प्रोत्साहन दिले. रेव्ह. टिळकांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांना मोठा आधार दिला. त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केले.
वयाच्या 18 व्या वर्षी बालकवी यांचा विवाह झाला. वडील वारल्यानंतर वर्षाच्या आत विवाह करायचा, अशी रुढी असल्याने आई- भाऊ यांच्या आग्रहास्तव त्यांनी हा विवाह नखुशीनेच केला. त्यावेळी त्यांच्या पत्नीचे वय होते 7 वर्षे. कवी म्हणून त्यांचे नाव गाजत होते. मात्र, प्रापंचिक जीवन उपजीविकेचे निश्चित साधन नसल्याने अस्थिर झाले होते. मोठ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. रेव्ह. टिळकांच्या परिचयातून अहमदनगरच्या अमेरिकन मिशन हायस्कूलमध्ये पाचव्या इयत्तेत त्यांनी नाव घातले. 1911 च्या अखेरीस ते पुण्याला गेले. ‘केसरी ’ वृत्तपत्रात काहीकाळ नोकरी केली. त्यांची भ्रमंती थांबत नव्हती. 5 मे 1918 हा त्यांच्या जीवनातील काळा दिवस. आपल्याच तंद्रीत रेल्वे रुळातून चालत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. जळगावला त्यांच्या मित्राकडे त्यांना जायचे होते. पण मृत्यूने त्यांना ओढून नेले. अवघे 28 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. एवढ्याशा अल्प जीवनात एक श्रेष्ठ कवी म्हणून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकले.
हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती खेळत होती ती फुलराणी ही सर्वांनाच आवडणारी निसर्गमय सुंदर कविता…निसर्ग हाच त्यांच्या कवितेचा मध्यवर्ती बिंदू. या निसर्गाचे विभ्रम आपल्या काव्यातून बालकवी यांनी टिपले होते. त्यांच्या सर्व कविता अजरामर आहेत. तारकांचे गाणे, संध्यारजनी,अरुण, फुलराणी, आनंदी आनंद गडे, श्रावणमास, निर्झरास, बालविहग, पारवा, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, शून्य मनाचा घुमट, खेड्यातील रात्र, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, औदुंबर… इ. अशा असंख्य कविता आजही आपल्या मुखी आहे. ऐल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटातून … बालकवी यांनी काही बालकथाही लिहिल्या. प्राणी- वनस्पती यांच्यावर या बालकथा आधारित आहेत. असे आपले सर्वांचे बालकवी… यांना माझे कोटी कोटी प्रणाम…
किरण विठ्ठल पाटील – 9270860296 (लेखक हे जळगाव येथील भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक आहेत.)