Wednesday, October 21, 2026
HomeनगरAhilyanagar : खत वितरणात आता डिजिटल पारदर्शकता!

Ahilyanagar : खत वितरणात आता डिजिटल पारदर्शकता!

‘एफएफएस’ प्रणालीची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

केंद्र शासनाच्या रसायन व खत मंत्रालयाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘फे्रमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) डिजिटल प्रणालीची जिल्ह्यात प्रभावी, पारदर्शक आणि शेतकरीहिताच्या दृष्टीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. या संदर्भात जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीत एफएफएस प्रणालीची कार्यपध्दती, खतांचे नियोजन, उपलब्ध साठा तसेच शेतकर्‍यांना सुलभ आणि पारदर्शक पध्दतीने खते उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

एफएफएस डिजिटल प्रणालीमुळे शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांच्या गरजेनुसार योग्य प्रमाणात खतांची शिफारस मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावरील नोंद आणि पीक नोंदीनुसार जमिनीचे क्षेत्रफळ विचारात घेऊन खतांची आवश्यक मात्रा संगणकीय प्रणालीव्दारे सुचविली जाणार आहे. त्यामुळे अनावश्यक खत खरेदी टाळता येऊन उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे. या प्रणालीमुळे खत वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येणार असून शेतकर्‍यांना शासकीय व वाजवी दरात आवश्यक तीच खते खरेदी करता येणार आहेत.

कोणत्याही प्रकारची सक्तीची खत खरेदी करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे खत विक्रीतील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. प्रणालीवर खताची नोंदणी केल्यानंतर शेतकर्‍याला व्दिमितीय संकेत-चित्र (क्यूआर संकेत) मिळणार आहे. हे संकेत-चित्र खत विक्री केंद्रावरील इलेक्ट्रॉनिक विक्री यंत्रावर (ई-पॉस) दाखविल्यानंतर खताची विक्री केली जाणार आहे. शेतकरी स्वतः किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी तीन दिवसांच्या आत खताची खरेदी करू शकणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या 65 हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक खतसाठा उपलब्ध असून खतांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, विविध रासायनिक खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संघटनेचे प्रतिनिधी छबुराव हराळ तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दुकानात जाण्यापूर्वीच साठा पाहता येणार
एफएफएस प्रणालीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकर्‍यांना त्यांच्या तालुक्यातील अधिकृत कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असलेला प्रत्यक्ष खतसाठा पाहता येणार आहे. दुकानात जाण्यापूर्वीच उपलब्ध साठ्याची माहिती घेऊन शेतकरी आपल्या पसंतीचे कृषी सेवा केंद्र निवडू शकतील. यामुळे अनावश्यक भटकंती आणि वेळेचा अपव्यय टाळता येणार आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : धर्म, अहंकार आणि सिंहस्थ

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक नाशिकच्या पवित्र भूमीत येत्या ३१ ऑटोबरला होणारा सिंहस्थाच्या ध्वजारोहणाचा सोहळा हा केवळ एक धार्मिक विधी नाही,...