Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखदाखल गुन्हे रद्द, वर्षारंभाच्या आनंदात ‘सोने पे सुहागा’

दाखल गुन्हे रद्द, वर्षारंभाच्या आनंदात ‘सोने पे सुहागा’

आज गुढीपाडवा! लोक गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत करतात. आजपासून मराठी मुलखात नववर्षाची सुरुवात होते. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. आजच्या शुभ मुहूर्तावर लोक संसारोपयोगी नव्या वस्तुंची खरेदी करतात. स्थावर मालमत्तेच्या व वाहन खरेदीलाही प्राधान्य दिले जाते. आजच शुभकार्य सुरु करण्याकडेही अनेकांचा कल असतो. यंदाच्या नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहात करोना निर्बंधमुक्तीची निर्भेळ भर पडली आहे. सरकारने करोनाचे सगळे निर्बंध मागे घेतले आहेत. लोकांनी सणसमारंभ उत्साहात साजरे करावेत असे आवाहन केले आहे. लोकांची गेली दोन वर्षे निरुत्साहात आणि चिंता करण्यात पार पडली. अनेकदा वेळ कसा जातो किंवा दिवस कसे पटापट जातात हे कळतच नाही अशी भावना लोक आनंदाच्या भरात व्यक्त करतात. तथापि करोनाची दोन वर्षे मात्र संपता संपत नव्हती हीच सार्वत्रिक भावना आहे. कारण समाजात करोनाची दहशत होती. साथीचे समाजाच्या सर्वच क्षेत्रांवर विपरित परिणाम झाले. करोनाच्या साथीपेक्षा त्याबद्दलच्या प्रचारामुळे लोक कमालीचे तणावात होते. त्यात निर्बंधांची भर पडली होती. लोकांचे दैनंदिन आयुष्य करोना निर्बंधांमध्ये बांधले गेले होते. निर्बंधांच्या भीतीने ज्येष्ठांनी व बालकांनी घराबाहेर पडणेच बंद केले होते. माणसे एकमेकांना पारखी झाली होती. सहज होणार्‍या भेटीगाठीही माणसांना विसराव्या लागल्या होत्या. श्वास घेणे अवघड झाले तरी तोंडाला मुसके बांधावेच लागत होते. उन्हाळ्याच्या तीव्र तापमानात तर लोकांचे यामुळे अधिकच हाल झाले होते. एकवेळ करोना झाला तरी चालेल पण तोंडाला मुसके बांधणे आणि घरात बसून राहाणे नको असे विनोदही समाजमाध्यमांवर फिरत होते. आता मात्र सरकारने लोकांना मोकळ्या हवेत श्वास घेण्याची परवानगी दिली आहे. तोंडाला मुसके बांधणे सुद्धा ऐच्छिक केले आहे. कोणत्याही प्रकारचे संभाव्य आजार टाळण्यासाठी मुसके बांधावे की न बांधावे याचा निर्णय लोकांवर सोपवला आहे. त्यामुळे लोकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. नव्या वर्षाचा आनंद द्विगुणित व्हावा असा अजून एक निर्णय सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे दुधात साखर अशी लोकांची भावना आहे. लोक निर्बंधांना कंटाळले होते. त्यामुळे सक्तीच्या टाळेबंदीच्या काळातही बर्‍याच लोकांकडून कुठल्या ना कुठल्या निर्बंधाचे कळन-नकळत उल्लंघन झालेच होते. अशा हजारो नागरिकांवर त्यावेळी पोलीसांकडून गुन्हे दाखल केले गेले होते. त्यात विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता असे सांगितले जाते. त्या काळात बैलगाडा शर्यतींवरही बंदी घातली गेली होती. तो आदेश मोडणारांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले होते. करोना काळात दाखल केले गेलेले असे सर्व गुन्हा मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे लोकांचा पाडव्याचा आनंद द्विगुणित आणि निर्भेळ झाला आहे. करोनाची दोन वर्षे निर्बंधांच्या बाबतीत सरकारी यंत्रणांकडुनही जरा जास्तच काटेकोरपणा दाखवला गेला याचा अनुभव लोकांनी घेतला होता. वास्तविक सरकारी घोषणा किंवा नियम आणि त्यांची अंमलबजावणी यांचा दूरदूरचाही संबंध नसतो असा जनतेचा नेहमीचा अनुभव आहे. तथापि करोना निर्बंधांच्या बाबतीत मात्र यंत्रणेचे वेगवेगळे विभाग ‘अ‍ॅक्शन मोड’ वर होते. निर्बंध मोडल्याबद्दल लोकांनी फटके देखील खाल्ले होते. त्या सगळ्याचे निराकरण खटले मागे घेण्याने होणार आहे. काही बाबतीत कधी कधी अकारण अतिरेक होतो व जनतेला सतावले जाते याची अप्रत्यक्ष कबुली गुन्हे रद्द करण्याच्या शासन निर्णयातुन डोकावली आहे असेही संबंधितांना वाटल्यास नवल ते काय!

- Advertisment -

ताज्या बातम्या