कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस बळ अपुरे असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढला आहे. वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात रिक्त असलेली एकूण 25 पदे भरण्यासाठी आपण यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. यामध्ये आपण वैयक्तिक लक्ष घालून ही रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत, अशी मागणी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे शुक्रवारी कोपरगाव येथे आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीसाठी आले असता सौ. कोल्हे यांनी त्यांच्याकडे उपरोक्त मागणी केली. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येशीकर उपस्थित होते.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, सद्य:स्थितीत कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात 3 अधिकारी, 41 कर्मचारी कार्यरत असून 11 कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्यात 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक व 2 पोलीस उपनिरीक्षक अशा 3 पोलिस अधिकार्यांची व 14 कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. दोन्ही पोलिस ठाण्यांमध्ये एकूण 25 पदे रिक्त आहेत.
लोकसंख्या व गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे दैनंदिन कामकाज, विविध गुन्ह्यांचा तपास, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी व सण, उत्सव, मिरवणूक आदी कार्यक्रमांसाठी बंदोबस्त आदी कामे पार पाडताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी पोलिस यंत्रणेवरचा ताण वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अधिकारी व कर्मचार्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्याची आवश्यकता असल्याचे सौ. कोल्हे यांनी निदर्शनास आणून दिली. रिक्त पदे भरण्यासंबंधी त्वरित योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी ओला यांच्याकडे केली आहे.