Saturday, September 28, 2024
Homeब्रेकिंग न्यूजइगतपुरी तालुक्यातील मुंडेगावमध्ये साकारणार चित्रनगरी

इगतपुरी तालुक्यातील मुंडेगावमध्ये साकारणार चित्रनगरी

मंत्री दादा भुसे यांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे चित्रनगरी साकारण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने 12 वर्षांपूर्वी दिलेला प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित होता. या चित्रपटनगरीसाठी जागा उपलब्ध असून, मंजुरीसाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरण 2024 मध्ये या चित्रनगरीचा समावेश करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात ही चित्रपटनगरी उभारण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. आशिया खंडातील पहिला चित्रपट निर्माण करून दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या नावाने नाशिकमध्ये चित्रपटनगरी असावी, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. 2010-11 मध्ये नाशिक-मुंबई महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या हद्दीत सुमारे 100 एकर गायरान जागेवर चित्रनगरी साकारण्याचा प्रस्ताव दिला होता.

शासनाच्या 127 एकर जागेवर दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगावच्या धर्तीवर भव्यदिव्य चित्रनगरी उभारण्याचा प्रस्ताव सन 2009 पासून प्रलंबित आहे. त्यानुसार चित्रपट महामंडळ कार्यालयाने राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे दोन प्रस्ताव पाठवले आहेत. प्रस्ताव दाखल केला तेव्हा 80 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता या प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर या पाच जिल्ह्यांच्या सीमांलगत घोटी-इगतपुरी या ठिकाणी प्रस्तावित चित्रनगरी उभारली गेल्यास चित्रपटनिर्मिती संस्थांना चित्रिकरणासाठी सुयोग्य जागा उपलब्ध होईल. हे ठिकाण पाच जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती असल्याने चित्रिकरणासाठी आवश्यक सोयीसुविधा, दळणवळण व्यवस्था, पूर्व-निर्मिती (प्री-प्रॉडक्शन) व पश्चात निर्मितीकरता (पोस्ट प्रॉडक्शन) आवश्यक बाबी येथे सुलभरीत्या उपलब्ध होतील. त्यामुळे मौजे मुंढेगाव (ता. इगतपुरी, जि.नाशिक) येथे चित्रनगरीची उभारणी करण्याचा समावेश करण्यात आला आहे.

नाशिकच्या कलाविश्वाला नवा आयाम
मुंढेगाव येथे या जागेवर चित्रनगरी साकारल्यास नाशिकमधील युवकांना तसेच कलाकारांना संधी तर मिळेलच तसेच इगतपुरीच्या विकासाला चालना मिळेल. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते इगतपुरी अंतर जवळपास एक तासाने कमी होणार असल्याने मुंबईतील कलाकारांना इगतपुरीत येणे सहज शक्य होईल. याबरोबरच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे प्रशिक्षण केंद्र भविष्यात सुरू होऊ शकते. या बाबींमुळे नाशिकच्या वैभवात भर पडणार असल्याने ही सुरुवात महत्त्वाची ठरणार आहे. त्यासोबतच नाशिकच्या कलाविश्वाला नवे आयाम लाभणार असल्याने नाशिकच्या कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या