Wednesday, June 19, 2024
Homeनाशिकपीकविमा : कृषी विभागाचा अंतिम अहवाल उद्या सादर होेणार

पीकविमा : कृषी विभागाचा अंतिम अहवाल उद्या सादर होेणार

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्ह्यातील पाच लाख ८६ हजार शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा उतरवला आहे. भीषण दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर नुकसान भरपाईसाठी तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जिल्ह्यात ५० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून, कृषी विभागामार्फत सोमवारी (ता. २८) अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने संपत आले आहे. अजुनही जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात खरिपाची ९२ टक्के पेरणी झाली. अशा परिस्थितीत सलग २१ दिवस झाले तरी पाऊस न झालेल्या भागाचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येत आहे.

कृषी विभागाचे अधिकारी व शेतकऱ्यांचा पीकविमा उतरविलेल्या ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी थेट बांधावर जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी १५ तालुक्यांमध्ये १२१ महसूल मंडळातील निवडक गावांमध्ये जाऊन तेथील पिकांची पाहणी करून ऑनलाइन स्वरूपात त्याची नोंद करत आहे.

कृषी विभाग व इन्शुरन्स कंपनीमार्फत सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर अंतिम अहवालाच्या आधारे शेतकऱ्यांना मदत जाहीर होईल. पीकविमा कंपनी पात्र शेतकऱ्यांचे मागील सात वर्षांची वार्षिक उत्पन्नाची सरासरी लक्षात घेऊन भरपाई निश्चित करेल.

त्यापैकी २५ टक्के रक्कम पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल. एका गटात दोन, तीन शेतकऱ्यांची नावे असतील तर उर्वरित शेतकऱ्यांची संमती घेणे बंधनकारक आहे. कंपनीमार्फत भरपाई मिळण्यापूर्वीच भाऊबंदकी उफाळून आली आहे. एका गटाच्या सातबारा उताऱ्यावर दोन- तीन भावांची नावे आहेत. त्यापैकी एकाने पीकविमा उतरविला.उर्वरित भाऊ त्याला मदत देऊ नका म्हणून पीकविमा कंपनीशी संपर्क साधत आहेत. दुष्काळाच्या संकट काळापेक्षाही भाऊबंदकी वरचढ ठरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या