मुंबई l Mumbai
‘शक्तिमान’ साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना सध्या त्यांच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकले आहेत. ‘मी टू’ (Me Too) प्रकारणावर बोलताना त्यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सगळ्या स्तरांतून त्यांच्यावर टीका होते आहे. त्याच बरोबर संतापलेल्या नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली होती. त्यातच मुकेश खन्ना यांनी त्यांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे.
मुकेश खन्ना यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे कि, “ते कधीही महिलांच्या विरोधात नव्हते. मला खरोखर आश्चर्य वाटते की माझे एक विधान अत्यंत चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे. मी महिलांविरोधात असल्याचं म्हटलं जात आहे. जितका मी महिलांचा आदर करतो, तितका आदर कदाचित कोणी करत नसेल. मला महिलांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटते. बलात्काराच्या प्रत्येक घटनेविरूद्ध मी बोललो आहे.” तसेच “महिलांनी काम करू नये, असे मी कधीही म्हटलं नाही. मी तुम्हाला फक्त हे #Me Too चळवळ कशी सुरू झाली ते सांगत होतो. आपल्या देशात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. मी या व्हिडिओमध्ये महिला कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर त्यांना कोणत्या स्वरुपाच्या अडचणी येऊ शकतात, यावर प्रकाश टाकत होतो. जसे की, महिला घराबाहेर पडल्यानंतर घरातील मुले एकटी पडतात. मी पुरुष आणि महिला धर्माबद्दल बोलत होतो, जे हजारो वर्षांपासून चालू आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावू नका. माझे शेवटचे चाळीस वर्षे, माझे चित्रपट प्रवास याची पुष्टी करतो की, मी नेहमीचं स्त्रियांचा आदर केला आहे. या विधानामुळे जर एखाद्या महिलेच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की, मी माझा मुद्दा योग्य पद्धतीने मांडू शकलो नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘मी टू’ प्रकरणावर भाष्य करताना अभिनेते मुकेश खन्ना यांनी महिलांनाच चुकीचे ठरवले आहे. ते म्हणाले, ‘महिलांचे काम केवळ घर सांभाळणे होते. महिलांनी घराबाहेर पडून काम करायला सुरुवात केल्यावर हे ‘मी टू’ सारखे प्रकार घडायला लागले. आज स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालण्याची वार्ता करतात’. त्यांच्या याच वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली होती.