Sunday, October 13, 2024
Homeब्लॉगशोध घ्या स्वत:चा

शोध घ्या स्वत:चा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सदर.

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, आपल्या ‘आवड-निवड’च्या खेळाच्या मध्यंतरात आपण आपली आवड का जाणून घ्यायची? आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर का करायचे? यासारख्या प्रश्नांंविषयी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आवड, छंद व करिअर यादृष्टीने जेव्हा तुम्ही स्वतः विचार करू लागता तेव्हा त्या क्षेत्रातील प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींचा विचार करू लागतात. आपल्या आवडीच्या क्षेत्रातील प्रत्येक गोष्ट सूक्ष्मपणे निरीक्षण करून स्वतः ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करू लागता. अशारीतीने तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात पारंगत होता. सतत एकाच गोष्टीचा पाठपुरावा केल्यावर तुम्हांला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य प्राप्त करून यश मिळवणे काहीसे सोपे होते. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासारख्याच एका विद्यार्थ्याशी पत्राद्वारे मारलेल्या गप्पांमधून तुम्हांलाही यशाचे मोती गवसले तर मला नक्कीच आनंद होईल. चला पत्रमय गप्पा वाचूया! आहे ना गंमत शब्दांची! गप्पा पण कधी वाचता येतील, असा विचार तुम्ही कधी केला नसेल नाही का?

चि. मितेश, यांस शुभाशीर्वाद.

- Advertisement -

तुला अक्षरांशी खेळायला आवडते. अक्षरांना वेगवेगळे आकार द्यायला आवडते, पण नुसती अक्षरे रेखाटल्याने करिअर थोडेच करता येईल? असे तुला वाटते. तुला प्रश्न पडला असेल की, आवड आणि करिअरची सांगड तरी कशी घालायची? तुझ्या या प्रश्नाचे मी लेखात आधी सांगितल्याप्रमाणे तुला तुझ्या आवडीचा सतत विचार करून कल्पकता आणावी लागेल. तेव्हाच या क्षेत्रातून उत्स्फूर्तपणे करिअर करू शकशील. तुला एका गोष्टीतून माझा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. एक राजा होता. दरबारात मंत्रिपदासाठी निवड करण्यासाठी राजाने सभा बोलावली होती. परीक्षेसाठी बरेच लोक उपस्थित होते. राजाने दरबाराच्या मधोमध एक मोठा दगड ठेवला होता. राजाने प्रत्येक उमेदवाराला हा दगड पाहून तुला काय वाटते? असा प्रश्न विचारला. पहिला उमेदवार म्हणाला, हा दगड शेतातल्या तुटलेल्या बांधाच्या ठिकाणी ठेवला तर शेतातले पाणी वाहणे थांबून जाईल. दुसरा म्हणाला, या दगडातून जातं, दिवा किंवा पाटा-वरवंटा बनवता येईल. तिसरा म्हणाला, या दगडाने कोणतीही वस्तू फोडता किंवा तोडता येईल. चौथा म्हणाला, या दगडातून एक सुंदर शिल्प कोरता येईल. दगडातून एक ‘सुंदर शिल्प कोरता येईल’ असे उत्तर देणार्‍या व्यक्तीची राजाने मंत्री म्हणून निवड केली. पहिला उमेदवार शेतकरी होता. दुसरा उमेदवार दगडफोड्या होता. तिसरी व्यक्ती बळाचा वापर करून तोडफोड करणारी होती आणि चौथी व्यक्ती ही सुंदर कलाकृती निर्माण करणारी होती. शेतकरी हा सृजन करणारा होता, दगडफोड्या हा सांगकाम्या होता तर बळाचा वापर करणारी व्यक्ती तोडफोड करणारी होती आणि चौथा उमेदवार सृजनात्मक, कलात्मक, कल्पक व सौंदर्य निर्माण करणारा होता. या गोष्टीतून नेमके काय लक्षात आले तर एकाच वस्तूचा वापर कसा करायचा? या प्रश्नाचे उत्तर वेगवेगळे आले कारण प्रत्येकाची आवड वेगळी आहे आणि त्यानुसार एकाच वस्तूचा उपयोग वेगवेगळा आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, आवडीतून आपले करिअर उंचावत नेणे आपल्या हातात नक्कीच आहे. आज अक्षरांच्या दुनियेतही करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. ‘कॅलिग्राफी’ या कलेला आज खूप मागणी आहे. दुकानांच्या नावांच्या कलात्मक पाट्या, पुस्तकांच्या मुखपृष्ठावरील कलात्मक नावे, वाहनांवरील नावांची कलात्मक अक्षरे, वाहनांवरील कलात्मक नंबर प्लेटस्, घरांवरील नावांची सुंदर व सुबक अक्षरे आणि कलात्मक नेमप्लेटस् बनवणे. अक्षरांचे की स्टॅण्ड, अक्षरांचे किचेन्स, कलात्मक अक्षरांची रांगोळी व विविध चित्रे काढणे, कोणत्याही नावातून गणपती रेखाटणे, किंवा इतर वस्तूंचे आकार काढणे, चित्रपटांच्या नावांची बॅनर्स बनवणे अशा अनेक गोष्टी अक्षरांच्या माध्यमातून कलात्मकतेेचे रूप धारण करून सर्वांसमोर येतात. लक्षात आले ना..तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

तुझी, ताई

- Advertisment -

ताज्या बातम्या