धुळे – Dhule – प्रतिनिधी :
शहरातील चाळीसगाव रोडवरील पिंप्री शिवारातील कृषी विभागाच्या कृषी चिकित्सालयामधील स्टोअरला अचानक आग लागली. त्यात महत्वपुर्ण कागदपत्रे, फाईली आदी जळून खाक झाले आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अग्नीशमन विभागच्या बंबानी आग विझविली.
पिंप्री शिवारात कृषी विभागाचे कृषी चिकित्सालय तसेच शेतकरी कृषी सल्ला केंद्रची इमारत आहे. या इमारतीत आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. आगीत गोडाऊन मधील फाईल्स, कागदपत्रे, शेतकरी प्रशिक्षणासंदर्भातील आवश्यक साहित्य तसेच फर्निचर जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच महापालिकेचे अग्नीशामक दलाचे बंब दाखल झाले. लिडींग फायरमन अतुल पाटील, वाहन चालक दगडु मोरे, फायरमन पांडुरंग पाटील, शाम कानडे यांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत कुठलीही जिवीत हानी झाली नसून आर्थिक नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागातील सुत्रांनी दिली आहे.