नाशिक। प्रतिनिधी Nashik
शहरातील तपोवन येथे लोकेश लॅमिनेटिस या प्लायवूडच्या फॅक्टरीला गुरुवारी रात्री(दि. १७) भीषण आग लागल्यानंतर पंधरा तास उलटूनही तिची धग रात्री उशिरापर्यंत कायम हाेती. त्यातच, शुक्रवारी याच भागातील इंद्रायणी लाॅन्सजवळील सुहान फर्निचर दुकानासही आगेने वेढा घातला. एकाच भागात दाेन ठिकाणी आगीच्या गंभीर घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त हाेत असून या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. दाेन्ही ठिकाणांची आग शमविण्यासाठी २२ हून अधिक बंबांच्या साहाय्याने डझनभर फेऱ्या सुरु आहेत.
लाेेकेश लँमिनेट्स या कंपनीमध्ये अचानकपणे गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास आगीचा भडका उडाला. घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. आग विझवण्यासाठी या फॅक्टरीच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्यावरून जवानांनी पाण्याचा मारा सुरू करुन नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यांवर वाहतूक व वर्दळ नव्हती. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी किमान वेळेत पोहोचता आले व आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास तातडीने सुरुवात झाली. मात्र लाकडामुळे आगीचे स्वरुप आक्राळविक्राळ असल्याने अद्यापही आग आटोक्यात आलेली नाही, असे अग्निशमन विभागाने सांगितले आहे.
दरम्यान, नाशिक महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनमध्ये असलेल्या विहिरीच्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे आता तिथेही पाण्याचे टंँकर भरण्यासाठी अडथळे आले. ८ बंबानी प्रत्येकी २ फेऱ्या या विहिरीवरून केल्या. जीपीओ जलकुंभ इथून पाण्याचा भरणा बंबांमध्ये करण्यात आला. या ठिकाणीसुद्धा पाण्याचा पुरवठा कमी झाला असल्यामुळे पाण्याचे प्रेशर कमी आहे. त्यामुळे बंब भरण्यासाठी वेळ लागत असून एका पाठोपाठ चार ते पाच बंबांच्या इथे रांगा लागल्या आहे.
नाशिक अग्निशमन दलाचे १२ बंब तसेच पिंपळगाव बसवंत, अंबड एमआयडीसी, सिन्नर, मालेगाव येथील प्रत्येकी एक असे १६ बंब, आयएसपी सीआयएसएफचा एक असे १७ बंबानी प्रत्येकी पाच फेऱ्या मारून रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम केले. मात्र, शिंगाडा तलाव, पंचवटी व जीपीओतील पाणी कमी झाल्याने बंब व ब्राऊझर भरण्यास विलंब हाेत गेला. तरी अद्यापही दाेन्ही ठिकाणांच्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.