धुळे । dhule । प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गा लगत असलेल्या किल्ले लळींगच्या कुरणात (Laling Kuran) सायंकाळी अचानक आग (Fire breaks) लागली. या घटनेला पाच तास उलटूनही अग्नीशामक बंब पोहचले नसल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
किल्ले लळींगच्या परिसरात शेकडो एकर वनक्षेत्र असून लळींग कुरण म्हणून हे संरक्षीत करण्यात आले आहे. या कुरणाच्या पुर्वीला अर्थात मुंबई-आग्रा मार्गालगतच्या दिशेने तिखी बीटमध्ये असलेल्या डोंगर व परिसराला आग लागल्याचे स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ कुरणाकडे धाव घेतली. मात्र या ठिकाणी कोणतेही वन अधिकारी, कर्मचारी आढळून आले नाही. केवळ स्थानिक रखवालदार आढळून आला. त्याने व गावकर्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला
. परंतू संपुर्ण डोंगरासह परिसरात पसरलेल्या आगीचे लोळ बघून रहिवाशांचे प्रयत्न असफल ठरले. रात्री उशिरापर्यंत वनाधिकारी अथवा आग विझविण्यासाठीचे बंब आढळून आले नसल्याचेही प्रत्यक्ष दर्शनीचे म्हणणे आहे. आगीचे कारण समजू शकले नसले तरी ही आग मानवनिर्मित असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. रात्री उशिरा काही वनकर्मचारी या ठिकाणी पोहचले.
वन्य जीवांची हानी?
लळींग कुरणात ससे, हरीण, मोरे, लांडोर, कोल्हे, लांडगे, माकडे यांच्यासह पशुपक्षांचा मोठा वावर आहे. आज सायंकाळी या परिसरात आग लागल्यानंतर ती वार्याच्या वेगाने पसरत गेली. यातून प्राण वाचविण्यासाठी ससे व हरिण सैरावैरा जीव घेवून पळत असल्याचे आम्ही बघितले असेही स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. या आगीत काही वन्य जीवांची हानी झाल्याची भिती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.