सटाणा । प्रतिनिधी Satana
शहरातील जाधव नगरातील सीटी मॉलच्या गोदाम व राहत्या बंगल्यास भल्या पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागल्याने जीवनावश्यक खाद्यपदार्थांसह फर्निचर, रोख रक्कम, संगणक, दुचाकी वाहने या अग्नितांडवात जळून भस्मसात झाले. या आगीत 90 लाखाहून अधिक वित्तहानी झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.
शहरातील साठ फुटी रोड वरील भाजीपाला गुजरीतील सीटी मॉलचे मालक दिपक जाधव यांच्या जाधव नगर मधील राहत्या बंगल्याजवळच मॉल साठी लागणा-या जीवनावश्यक वस्तूंचे गोदाम आहे. गोदामात तेलाचे बँरल, साखर, सर्व प्रकारच्या डाळी, धान्य, मुरमुरे, तांदुळ आदी जीवनावश्यक वस्तूंनी भरलेल्या पोत्यांसह मॉलमध्ये विक्रीसाठी लागणार्या विविध खाद्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात साठा होता.
मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटने गोदामात आग लागली. रात्रीच्या सुमारास हवेचा जोर असल्याने आग गोदामात क्षणार्धात पसरून ंपुर्ण गोदाम आगीच्या ज्वालांनी वेढले गेले. या गोदामाच्या आगीची दाहकता जाधव यांच्या राहत्या बंगल्याला लागल्याने घरातील फर्निचर, गृह उपयोगी वस्तू,पडदे, कपडे आदींना देखील आगीची झळ मोठ्या प्रमाणात बसली.
आगीत गोडावून मधील खाद्यपदार्थांसह रोख रक्कम, दुचाकी वाहने, संगणक, घरातील संसार उपयोगी वस्तूंसह फर्निचर कपडे जळून खाक झाले. घराच्या वरच्या मजल्यावर जाधव कुटुंबीय झोपलेले असतांना धुराचे लोळ तीथपर्यंत पोहचल्याने जाधव कुटुंबीयांमध्ये घबराट निर्माण झाली.
गोडावून आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसले. परिसरात अंधारात धुराने घरांमध्ये प्रवेश केल्याने गाढ झोपेत असलेले नागरीकही भयभीत झालेत आणि घराबाहेर येऊन मदतीसाठी धावले. नगरपालिकेच्या अग्निशामक बंबांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तलाठी जयप्रकाश सोनवणे, कोतवाल रवि बच्छाव यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.