Tuesday, November 10, 2026
HomeनगरShrirampur : फटाक्याच्या पैशाच्या वादातून एकाची हत्या

Shrirampur : फटाक्याच्या पैशाच्या वादातून एकाची हत्या

श्रीरामपूर शहराजवळील टिळकनगरची घटना || आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील टिळकनगर परिसरात फटाक्याच्या पैशांच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका 50 वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस 8 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) हत्येसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मोईनुद्दीन शकील पठाण (वय 23, रा. पंचशील कॉलनी, जामा मस्जिद शेजारी, टिळकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास याच परिसरातील सागर राहुल गुंजेकर, आनंद अमर पवार, अमित रविकांत पटारे आणि उमर शेख हे स्विफ्ट डिझायर कारमधून मोईनुद्दीन पठाण यांच्या फटाक्याच्या दुकानावर आले.

- Advertisement -

त्यांनी 800 रुपयांचे फटाके खरेदी केल्यानंतर फिर्यादीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता, त्यांनी पैसे देण्यास नकार देत तू मला ओळखत नाही का, तुला काय करायचे ते कर, असे म्हणून शिवीगाळ केली. यावरून फिर्यादीने त्यांच्याकडून फटाके परत हिसकावून घेतले असता, आरोपींनी त्यांना रात्री बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर सोबत असलेले अमित रावसाहेब कोळगे, मनोज रावण साळवे व सिद्धार्थ रेणे यांनीही येऊन तुझा आज गेमच करून टाकतो, अशी धमकी देत तेथून निघून गेले. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अमित पटारे, मनोज साळवे, सिद्धार्थ रेणे हे मोटारसायकलवर, तर अमित कोळगे व उमर शेख हे मोपेडवरून फिर्यादीच्या घरासमोर आले. त्यातील अमित पटारे याने फिर्यादीवर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला, जो फिर्यादीने चुकवला. यावर फिर्यादीने आरडाओरडा केल्याने त्यांचे चुलते शफी नवाब पठाण, भाऊ रियान आणि इतर नातेवाईक बाहेर आले व त्यांनी आरोपी अमित पठारे याला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो झटापट करून साथीदारांसह पसार झाला.

काही वेळातच आरोपींनी पुन्हा स्विफ्ट डिझायर कार वेगाने आणून दहशत माजवली. गाडीतून सागर गुंजेकर कुर्‍हाड घेऊन खाली उतरला, तर उमर शेख, आनंद पवार व अमित पठारे यांनी गाड्याबाहेर तलवारी आणि चोकू फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. यावेळी सागर गुंजेकरच्या सांगण्यावरून अमित पठारे याने फिर्यादीचे चुलते शफी नवाब पठाण यांच्या अंगावर भरधाव कार घालून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच वाचवण्यासाठी आलेल्या भारत कैलास खंडागळे आणि रियाज शेख यांच्यावरही गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी लोकांच्या अंगावर कार घालत असताना घरासमोर उभी असलेली रिक्षाला (क्र. एमएच 17 बीटी 4301) जोरदार धडक दिली, ज्यामुळे त्यांची स्विफ्ट कार पलटी झाली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शफी नवाब पठाण, भारत खंडागळे व रियाज शेख यांना प्रथमोचारासाठी साखर कामगार रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय अधिकारी तपासून शफी नवाब पठाण यांना मृत घोषित केले, तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 चे कलम 103(1), 109(1), 118(2), 352, 351(3), 189(2), 189(4), 190, 191(3) तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4 व 25 प्रमाणे सागर राहुल गुंजेकर, अक्षय राहुल गुंजेकर, आनंद अमर पवार, अमित रविकांत पटारे, अमित रावसाहेब कोळगे, मनोज रावण साळवे, सिद्धार्थ रेणे व उमर शेख या आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल बळीराम लहाने करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजरी, सोयाबीन, मूग आणि उडदाची भरपाई

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदा सुरूवातीपासून पावसाची स्थिती अनिश्चित असल्याने जिल्ह्यात चालू खरीप हंगामात जिल्ह्यातील 2 लाख 79 हजार 391 शेतकर्‍यांनी 4 लाख 77 अर्जाव्दारे विविध...