अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर सुतळी बॉम्ब पेटवून एकमेकांच्या दिशेने फेकण्याच्या प्रकारातून फुलसौंदर चौकात दोन गटांत जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पाचजणांसह अन्य दोन ते तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मल्हार चौक, स्टेशन रोड, येथील 35 वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी माळीवाडा येथील माहेरी वास्तव्यास आहेत. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्या आपल्या वहिनी आणि मामी यांच्यासोबत गप्पा मारत होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगा फटाके आणण्यासाठी घरात गेला होता.
दरम्यान, घरासमोरील रस्त्यावर काही मुले फटाके वाजवत होती. त्यांच्याकडून हातातील सुतळी बॉम्ब पेटवून रस्त्यावर फेकले जात होते. एका बॉम्बच्या स्फोटामुळे जमिनीवरील बारीक दगड उडून फिर्यादी आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलांच्या अंगावर पडले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. यानंतर फिर्यादी यांनी उभ्या असलेल्या मुलांना, फटाके अशा पद्धतीने फेकू नका, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही मुले तेथून निघून बागवान गल्लीच्या दिशेने गेली. त्यांचा शोध घेऊनही ती मुले मिळाली नाहीत. दरम्यान, फिर्यादीचा भाऊ तेथे आला. त्याने पानटपरीवरील व्यक्तीला, आम्ही तुमच्या सणामध्ये विघ्न आणतो का? मग तुम्ही आमच्या सणामध्ये विघ्न का आणता? असा जाब विचारला.
यावेळी तेथे असलेल्या तीन ते चार मुलांनी त्यांच्याशी वाद घालत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी महिला या मोईनुद्दीन बागवान याला जाब विचारण्यासाठी पुढे गेल्यानंतर त्याने मारहाण केली असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर तेथे महिलेचा मानलेला भाऊ आणि मुलगा आले. त्यांनी संबंधित तरुणांना फटाके फेकण्याबाबत जाब विचारला असता पुन्हा वादाला तोंड फुटले. यावेळी मोईनुद्दीन बागवान, समीर युसुफ बागवान (रा. आलमगीर), ताहेर मजिदउल्ला खान (रा. माळीवाडा), आफन जावेद शेख (रा. पिंजारगल्ली) आणि अमन राजू बागवान यांच्यासह अन्य दोन ते तीन तरुणांनी फिर्यादीचा भाऊ आणि मुलगा यांना झटापट करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रस्त्यावर हातातील फटाके पेटवून एकमेकांच्या दिशेने फेकण्याच्या प्रकारामुळे परिसरातील नागरिक तसेच रस्त्याने ये-जा करणार्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असूनही संबंधित तरुणांनी हा प्रकार सुरू ठेवल्याचा आरोपही महिलेने केला आहे.




