छत्रपती संभाजीनगर- Chhatrapati Sambhajinagar
वाढत्या गुन्हेगारी घटनांनी चर्चेत राहणाऱ्या पुंडलिकनगर हद्दीतील हनुमान नगरमधील महापालिकेच्या सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्याच्या घरात घुसून दोघांनी गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याची थरारक घटना सोमवारी घडली. हल्लेखोराने एक फायर केले. मात्र, सफाई कर्मचाऱ्याने मान खाली करताच गोळी भिंतीला लागली तर मारेकऱ्याचा दुसरा फायर हुकला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
गारखेडा परिसर, हनुमान नगरातील गल्ली नंबर ५ मधील प्रभाकर ऊर्फ प्रभू आनंद आहिरे (६०) हे मनपाचे निवृत्त सफाई कर्मचारी आहेत. त्यांना दोन मुले तर दोन मुली आहेत. एक मुलगा हा जेसीबीचालक तर दुसरा बांधकाम मिस्त्री आहे. एका मुलीचे लग्न झालेले आहे. प्रभू आहिरे हे वाणी यांच्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहतात. आज नेहमीप्रमाणे प्रभू आहिरे हे मुली, जावई व कुटुंबासह घरात असताना ४ वाजून २१ मिनिटांनी ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एक हल्लेखोर हा खाली थांबला तर दुसरा हल्लेखोर हा घरात घुसला. काही कळण्याच्या आत त्याने प्रभू यांच्या दिशेने गावठी कट्ट्याने गोळी झाडली. प्रसंगावधान राखत त्यांनी मान खाली केली असता गोळी भिंतीला लागली. तितक्यात हल्लेखोराने दुसरी गोळी झाडली. मात्र, ती हुकली. आरडाओरड केल्याने हल्लेखोराने घरातून पळ काढला. गोळीबाराच्या घटनेने आहिरे कुटुंबीय हादरून गेले.
अचानक घरात घुसून गोळीबार केल्याच्या घटनेने हनुमाननगरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. हनुमान नगरात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरात घुसून गोळीबार केल्याच्या घटनेने हादरलेल्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
निशाणा हुकल्याने जीव वाचला
दीड महिन्यापूर्वी वाणी यांच्या इमारतीत एक महिला भाडेकरू आपल्या दोन मुलांसह राहात होती. मोठा मुलगा हा हेडगेवार हॉस्पिटलमध्ये कामाला असून त्याचे मामाच्या मुलीसोबत लग्न झाले. त्या मुलीवर एक जण प्रेम करत होता. मुलीचे लग्न जुळल्यावर तरुणाने लग्नात गोंधळ घातला होता. तसेच जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती. महिलेने दीड महिन्यापूर्वी घर सोडले. त्या घरात प्रभाकर आहिरे हे भाड्याने राहण्यास गेले. हल्लेखोरांनी महिलेचे कुटुंब राहात असल्याच्या संशयावरून त्यांना घाबरविण्यासाठी गोळीबार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.