नवी दिल्ली | New Delhi
चीनमध्ये (China) वेगाने व्हायरल होत असलेला एचएमपीव्ही व्हायरसचा (HMPV Virus) अखेर भारतात शिरकाव झाला आहे. भारतातील पहिली केस बंगळुरु शहरातील बॅप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये नोंदविण्यात आली असून एका आठ महिन्यांच्या मुलीला याची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे बाळ देशातील एचएमपीव्ही बाधित पहिला रुग्ण ठरले आहे.
कर्नाटक राज्याच्या आरोग्य विभागाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे, त्यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेत नमुन्याची चाचणी केली नाही, परंतु खाजगी रुग्णालयाच्या निष्कर्षांवर शंका घेण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. तर एचएमपीव्ही रुग्णाबाबत अहवाल खाजगी रुग्णालयातून आले आहेत, मात्र त्यांच्या चाचण्यांच्या अचूकतेवर आम्हाला प्रश्नचिन्ह लावण्याचे कारण नाही, असेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.
तर चीनमध्ये एचएमपीव्हीच्या वाढत्या प्रकरणांमध्ये केंद्र सरकारने ४ जानेवारी रोजी संयुक्त देखरेख गटाची बैठक घेतली.या बैठकीनंतर सरकारने म्हटले होते की, फ्लूचा हंगाम लक्षात घेता चीनची स्थिती असामान्य नाही. तसेच केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, श्वासोच्छवासाच्या आजारांच्या कोणत्याही वाढीला सामोरे जाण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे. या हंगामात RSV आणि HMPV हे सामान्य इन्फ्लूएंझा विषाणू आहेत, ज्यामुळे चीनमध्ये फ्लूचे प्रमाण वाढत आहे. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून डब्ल्यूएचओला चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अपडेट देण्यास सांगितले आहे.
दोन वर्षांखालील मुलांना सर्वात जास्त होतो त्रास
एचएमपीव्ही हा आरएनए विषाणू आहे. जेव्हा विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड-१९ सारखी लक्षणे दिसतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. यापैकी दोन वर्षांखालील मुलांना सर्वाधिक त्रास होतो. चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, त्याच्या लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक बंद होणे आणि घशात घरघर येणे यांचा समावेश आहे. एचएमपीव्ही व्यतिरिक्त, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड -१९ ची प्रकरणे देखील नोंदवली जात आहेत. त्याच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
काय आहे एचएमपीव्ही विषाणू?
एचएमपीव्ही विषाणू तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड्समध्ये सन २००१ मध्ये आढळला होता. एचएमपीव्ही या सामान्य श्वसन विषाणूच्या संसर्गाचे सर्दी हे प्रमुख लक्षण आहे. श्वसनमार्गाचे विकार (आरएसव्ही) आणि फ्लूप्रमाणे हिवाळा तसेच उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा त्रास उद्धवतो. त्या अनुषंगाने एनसीडीसी (दिल्ली) यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये महाराष्ट्रात आत्तापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात अद्याप शिरकाव नाही
चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी महाराष्ट्रात अशा कोणत्याही रुग्णाची नोंद अद्याप झालेली नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.